कसाबच्या वयाची चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश

April 24, 2009 11:58 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल, मुंबई 26 / 11 च्या मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब हा अल्पवयीन आहे का याबाबत चाचणी करण्याचे आदेश आज टाडा कोर्टानं दिले. तसंच या चाचण्यांचे रिपोर्ट 28 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. कसाब हा अल्पवयीनअसल्याचा दावा त्याचे वकील अब्बास काझमी यांनी केला होता. 26 / 11 च्या मुंबईवरच्या हल्ला खटल्याच्या सुनावणीचा आजचा नववा दिवस होता. पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेऊन देशावर हल्ला करणारा कसाब अल्पवयीन आहे, असा युक्तीवाद कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी केला होता. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तो अल्पवयीन नसल्याचे कागदी पुरावेही दिले. पण कसाब अल्पवयीन आहे की नाही हे ठरवण्यासाठी कसाबची चाचणी करण्यात यावी असा युक्तीवाद त्यांनी केला. ' कसाब हा अज्ञान नाही. तो सज्ञान घोडा आहे आणि तसे पुरावे आमच्याकडे आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीची अल्पवयीन चाचणी ही तीन टप्प्यांत करण्यात येते. पहिली चाचणी शारीरिक स्वरूपात करण्यात येते. यात शारीरिक क्षमता, हार्मोन्स आणि डीएनए टेस्ट केली जाईल, दुसरी चाचणी म्हणजे ऑशी फिकेशन टेस्ट ऑफ जॉईंट म्हणजे त्याच्या हाडांचा ठिसूळपणा तपासला जाईल आणि तिसरी चाचणी म्हणजे डेंटल टेस्ट. यात त्याच्या दातांची चाचणी केली जाईल. या तीन चाचण्या केल्यानंतर कसाब अल्पवयीन आहे का हे ठरवलं जाईल. कसाबचे वकील अब्बास काझमींनी तो अल्पवयीन असल्याचा मुद्दा कोर्टात उचलून धरलाय. आधी कसाबला वकील मिळत नव्हता म्हणून खटला उशीरा सुरू करण्यात आला. आणि आता तर कसाबच्या वयाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे कोर्टाचा वेळ जात आहे. त्याचा परिणाम खटल्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायाधीश टाहिलानी यांनी लवकरात लवकर याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत.

close