पारोळा फटाका कारखान्याला नव्हता परवाना

April 24, 2009 5:18 PM0 commentsViews: 14

24 एप्रिल, जळगावप्रशांत बाग पारोळ्याच्या सावित्री फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्याला परवाना नसताना तिथे राजरोस काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. स्वत:चं राजकीय वजन वापरून बिनदिक्कतपणे फटाक्यांचा अवैध धंदा करणारा पारोळ्याचा नगराध्यक्ष गोविंद शिरोळे मात्र आजही पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. परिणामी कारखान्यात काम करणार्‍या निरपराधांचा जीव घेणा-या गोविंद शिरोळेला पोलीस कधी गजाआड करत आहेत याकडे जळगावकरांचं लक्ष लागलं आहे. अनेक कामगारांचा बळी घेणा-या पारोळा फटाका कारखाना दुर्घटनेचा तपास सध्या एलसीबी म्हणजेच लोकल क्राईम ब्रान्च करत आहे. 10 एप्रिलला घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात पोलिसांनी संबंधीत कंपनीचे मालक त्या व्यवसायाशी संबंधीत असलेले सर्व मॅनेजर आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. चंद्रकांत आणि विकास शिरोळे या गोविंद शिरोळेच्या दोन भावांचा या घटनेत समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून इतर आरोपींचा शोध घेण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कंपनीचं लायसन ज्यांच्या नावावर आहे त्या मनीषा चंद्रकांत शिरोळे, गोविंद एकनाथ शिरोळे, विकास एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे या व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. घटना घडून तेरा दिवस उलटलेत. आगीची धग आता विझली आहे. पण यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात मात्र कायमचा अंधार झाला आहे. आयुष्याची सुरुवात होण्याआधीच अखेर झालेल्या बालकामगारांचा बळी या कारखान्यातल्या स्फोटानं घेतला आहे. जखमींपैकी 8 जण धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे आता मागे राहिलेल्या त्यांच्या परिवाराला आता कोणाचांच आधार राहिलेला नाही.

close