ब्राझीलचा खुर्दा, जर्मनी ऐटीत फायनलमध्ये

July 9, 2014 10:44 AM0 commentsViews: 1294

brazil germany09  जुलै : फिफा वर्ल्ड कपमध्ये काल यजमान ब्राझीलचा धक्कादायक आणि लाजिरवाणा पराभव झाला. ब्राझीलचा 7-1 असा दारुण पराभव करत जर्मनीने फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल 12 वर्षांनी जर्मनीने पुन्हा एकदा फायनलमध्ये दिमाखदार एंट्री केली आहे.

पहिल्या सेमीफायनलमध्ये फुटबॉल जगतातले दोन जायंट्स ब्राझील आणि जर्मनी एकमेकांना भिडले. भारतीय वेळेनुसार काल रात्री 1.30 वाजता बेलो हॅरिझाँटेच्या स्टेडिओ मिनेरिओवर ही मॅच रंगली. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत ब्राझीलने एकही मॅच गमावली नव्हती. प्रत्येक मॅचमध्ये ब्राझील आणि जर्मनीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे या मॅचमध्ये वर्चस्वाची लढाई रंगेल यात कोणालाच शंका नव्हती. पण ब्राझीलचे दोन स्टार खेळाडू न्येमार आणि कॅप्टन थिऍगो सिल्वा हे सेमीफायनल खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला होता. आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेत गोल्सचा धडाका लावून प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत आपली दहशत निर्माण केलेल्या जर्मनीने या मॅचमध्येही सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवली. मॅचच्या अवघ्या पहिल्याच मिनिटाला ब्राझीलला कॉर्नर किक मिळाली पण त्यांना या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं तर 11व्या मिनिटाला जर्मनीच्या थॉमस म्यूलरने क्रूसच्या पासवर गोल मारून जर्मनीचे खाते उघडले. 23व्या मिनिटाला जर्मनीचा सर्वात अनुभवी खेळाडू मिरास्लॅव्ह क्लोसने शानदार गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली.

यानंतर टॉनी क्रूसने 24 आणि 26व्या मिनिटाला लागोपाठ दोन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर मॅचच्या 29व्या मिनिटाला सॅमी खेदिराने आणखी एक गोल करत जर्मनीला मॅचमध्ये विजयी आघाडी मिळून दिली.

सेकंड हाफमध्येही जर्मनीने आपला दबदबा कायम ठेवला. मॅचच्या 69 आणि 79व्या मिनिटाला अँड्र्यू शर्लेने लागोपाठ दोन गोल करत जर्मनीला 7-0 अशा भक्कम स्थानी पोहोचवलं. सामन्याच्या शेवटी म्हणजेच 90व्या मिनिटाला ब्राझीलच्या ऑस्करने एक गोल मारून ब्राझीलची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ब्राझीलला परावभाचा सामना करावाच लागला. एकीकडे ब्राझीलच्या खेळाडूंना रडू आवरत नव्हतं तर दुसरीकडे तब्बल 12 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवलेल्या जर्मनीने एकच जल्लोष केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये म्यूलरने पाच गोल करून गोल्डन बूटच्या स्पर्धेत आघाडी घेतली आहे तर ब्राझीलवरच्या या विजयानंतर जर्मनीच्या नावेही अनेक रेकॉर्ड्स नोंदवले जाणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close