स्वातमधल्या तालिबान्यांवर पाकिस्तानी लष्कर करणार कारवाई

April 24, 2009 5:45 PM0 commentsViews: 4

24 एप्रिल, इस्लामाबादपाकिस्तानातल्या स्वात खोर्‍यात असलेल्या तालिबान्यांवर पाकिस्तानी लष्कर पुन्हा कारवाई करण्याची शक्यता आहे. यापुढं दहशतवाद्यांशी कुठल्याही पद्धतीच्या वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असं अध्यक्ष झरदारी यांनी स्पष्ट केलं आहे. तर तालिबान्यांच्या घुसघोरीवर अमेरिकेनंही चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान तालिबानांच्या ताब्यात जाणार का याची भीती जगातल्या सगळ्याच देशांना आहे. विशेषतः भारत ह्या सर्व कारवायांवर बारीक नजर ठेवून आहे. स्वात प्रांतात पाक सरकारनं तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. तालिबाननं स्वात प्रांतात शरियत कायदा लागू केला. स्वातमध्ये इस्लामी कायद्याचा अमल सुरू झाला. आणि स्वात पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेलं. त्यानंतर तालिबानचं पुढचं टार्गेट होतं बुनेर. बुनेर इस्लामाबादपासून फक्त 100 किलोमीटरवर आहे. त्यामुळं तालिबानचा धोका, पाकिस्तानच्या अगदी गळ्यापर्यंतआला होता. शेवटी पाकिस्तान सरकारनं, तालिबानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. पाक सरकारच्या दबावानंतर , तालिबाननं बुनेरमधून माघार घ्यायची तयारी दाखवल्याचं कळतं आहे. पण येत्या 48 तासात लष्कर आणि तालिबान्यांमधला संघर्षही अटळ असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानमध्ये वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, तालिबानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय, पाकिस्तान सरकारनं घेतलाय. पाकिस्तान आता तालिबानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.तिकडे अमेरिकेनंही पाकिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कट्टरपंथीयांच्या हाती पडण्याचा धोका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये तालिबानचा वाढता प्रभाव, ही फक्त पाकिस्तानचीच नव्हे, तर आज सगळ्या जगाची डोकेदुखी बनत आहे.त्यातूनच पाकिस्तानवर लष्करी कारवाईचा दबाव वाढत आहे.

close