पुण्यात दुचाकीमध्ये स्फोट, 3 जखमी

July 10, 2014 3:10 PM0 commentsViews: 11193

4363pune_blast10 जुलै : पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागात फरासखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये दुपारी दोनच्या सुमारास एक कमी क्षमतेचा स्फोट झाला. हा स्फोट पार्किंगमध्ये असलेल्या स्प्लेंडर बाईकच्या डिक्कीत झाला. त्यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावर ताबडतोब बॉम्बशोधक पथक, पुणे एटीएस टीम आणि पुणे पोलिसांचे पथक पोहोचलं. या स्फोटाचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही.

घटनास्थळापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरजवळच आहे. घटनास्थळी बॉम्बविरोधी पथक दाखल झालंय. त्यांच्यापाठोपाठ वरिष्ठ पोलीस अधिकारीही दाखल झाले असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट दुचाकीच्या बॅटरीचा नाही असं कळतंय.अत्यंत गर्दीच्या परिसरात हा स्फोट झालाय.

घटनास्थळावर बॉल बेअरिंग, छरे, खिळे सापडले आहे. एटीएस टीमनेही हा स्फोट संशायस्पद असल्याचं म्हटलंय. तर आम्ही महाराष्ट्राच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत. आताच कुठला निष्कर्ष काढता येणार नाही असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय. या अगोदरही पुण्यात जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला होता त्यावेळी अतिरेक्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराची रेकी केली होती. त्यामुळे या घटनेबाबत पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

दुचाकी चोरून स्फोटासाठी वापरली

फरासखाना पोलीस स्टेशनच्यासमोर पार्किंगमध्ये ज्या स्पेलंडर या दुचाकीत स्फोट झाला तीचा नंबर हा एमएच 11 एक्यू 7174 आहे. ही दुचाकी चोरुन आणली असून स्फोटासाठी वापरलीय. ही दुचाकी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पिंपरी गावातील असल्याचं कळतंय.

पुण्यात योग्य दक्षता घेतली जात आहे -गृहमंत्री

पुणे स्फोटात 3 मोटारसायकलचं नुकसान झालं असून सगळीकडे योग्य ती दक्षता घेतली जात आहे. जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जनतेनं पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केलंय.

स्फोटांसाठी बॉल बेअरिंग, छरे, खिळ्यांचा वापर

अत्यंत गर्दीच्या ठिकाणाजवळ हा स्फोट घडवण्यात आलाय पण या स्फोटामागचा हेतू अजून स्पष्ट नाही, सर्व अँगलनं तपास केला जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली. या स्फोटांसाठी बॉल बेअरिंग, छरे, खिळ्यांचा वापर करण्यात आलाय असंही माथूर यांनी सांगितलं.या स्फोटात 2 जण किरकोळ जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये नेण्याइतके कुणीही गंभीर जखमी नाही. जखमींवर घटनास्थळी प्रथमोपचार करण्यात येत आहे. पण हा साधारण स्फोट नक्कीच नाही. स्फोटकांच्या माध्यमातून कुणीतरी हा स्फोट घडवला असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close