पुणे स्फोटाचा तपास एटीएसकडे, स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर ?

July 10, 2014 10:44 PM0 commentsViews: 2044

a010pune_blast10 जुलै : पुण्यात झालेल्या स्फोटाचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे. गणपतीपूर्वी पुण्यात झोन एक आणि झोन दोनमध्ये सीसीटिव्ही बसवण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आर आर पाटील यांनी दिली. त्यापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली.

दरम्यान, पुण्यामध्ये झालेल्या स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. आज दुपारी 2 च्या सुमारास फरासखाना पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये एका दुचाकीमध्ये स्फोट झाला. त्यात एका हवालदारासह 5 जण किरकोळ जखमी झालेत. या दुचाकीच्या डिकीमध्ये स्फोटकं ठेवल्याचा अंदाज आहे. चोरीची बाईक वापरून हे स्फोट घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही बाईक सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील पिंपरी गावातील आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

घटनास्थळी या स्फोटानंतर ताबडतोब बॉम्बशोधक पथक, पुणे एटीएस टीम आणि पुणे पोलिसांचे पथक पोहोचलं. चोरीची बाईक वापरून हा स्फोट घडवून आणल्याचं पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितलं. स्फोटासाठी स्फोटासाठी बॉल बेअरिंग, छर्रे, खिळ्यांचा वापर करण्यात आला. नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. हा साधारण स्फोट नाही, स्फोटकांद्वारे हा स्फोट घडवून आणल्याचा संशय पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. मात्र या स्फोटामागचा हेतू स्पष्ट नाही, सर्व बाजूंनी तपास केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराजवळ स्फोट झाल्यानं स्फोटांचं गांभीर्य वाढलंय. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले.

तर लोकंानी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. पुणे स्फोटासंबंधी गृहसचिवांनी राज्य पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितलाय. आता या क्षणी काहीही सांगता येणार नाही अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट केलं जाईल असं सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close