फिल्म रिव्ह्यु : ‘लय भारी’ !

July 11, 2014 5:28 PM0 commentsViews: 15912

अमोल परचुरे, समीक्षक

मराठी प्रेक्षक ‘लय भारी’ या सिनेमाची गेले अनेक महिने वाट बघत होते. मधल्या काळात ‘दुनियादारी’ आणि ‘टाईमपास’ने इतिहास घडवला, आणि आता लय भारी त्यापेक्षा मोठा पराक्रम करणार अशी चर्चा सुरू झाली. दिग्दर्शक निशिकांत कामत, संगीत अजय अतुल आणि रितेश देशमुखची मराठीमध्ये एंट्री एवढ्या गोष्टी सिनेमाची उत्सुकता ताणण्यासाठी पुरेशा होत्या, त्यात पत्रकार परिषदेत निशिकांत कामतने हे स्पष्ट केलं की ही ”पैसा वसूल’ प्रकारातली फिल्म आहे, प्रोमोज बघितल्यानंतर लक्षात आलं होतं की ‘रावडी राठोड’, ‘आर राजकुमार’ यांच्यासारखं काहीतरी बघायला मिळणार आहे.

424laibhariप्रत्यक्ष सिनेमा बघितल्यानंतर जाणवलं की लय भारी पूर्णपणे मासेसचा किंवा पिटातल्या प्रेक्षकाचा विचार करुन बनवलेला मसाला सिनेमा आहे. आता सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी क्लास आणि मास अशी तुलना करावी की नाही हा वादाचा मुद्दा असू शकेल, कारण हिंदीत अशा मसाला सिनेमांना क्लास ऑडियन्सची चांगली साथ मिळते, पण मराठीत आशयघन, सशक्त अशाच सिनेमांचीच अपेक्षा करणारा जो दर्दी आणि जाणकार असा क्लास ऑडियन्स आहे तो कदाचित लय भारी फारसा एंजॉय करू शकणार नाही, पण जो सर्वसामान्य प्रेक्षक आहे त्याच्या दृष्टीने लय भारी हा ब्लॉकबस्टर ठरेल.

सुपरहिट सिनेमांचा जो फॉर्म्युला असतो, म्हणजे ड्रामा, थोडा मेलोड्रामा, रिलीजआधीच लोकप्रिय झालेली गाणी, डान्स, धडाकेबाज ऍक्शन, डायलॉगबाजी हा सगळा मसाला लय भारी मध्ये आहे. अशा सिनेमांच्या स्टोरीकडे किंवा स्टोरीत नसलेल्या लॉजिकबद्दल कोणी प्रश्न विचारत नाही. लय भारी याच वर्गात मोडणारा सिनेमा आहे.

काय आहे स्टोरी ?

121laibhariलय भारी च्या कथेबद्दल फार सांगणं योग्य ठरणार नाही, कारण खूप नाही तरी थोडाफार सस्पेन्स आहेच. ही एक सूडकथा आहे. सूडकथेत असणारी सगळी आवश्यक पात्रं यामध्ये आहेत. संस्कारी आई आहे, तगडा व्हीलन आहे, काही धक्के आहेत, काही सरप्राईझेस आहेत. सलमान खानचा मराठी तडका आहे, पण कथेचा एकंदरित विचार केला तर ही कथा पसरट आहे आणि क्लायमॅक्सला रेंगाळलेली आहे. कथेतला बराचसा भाग हा हिंदीत यापूर्वी येऊन गेलेला आहे, पण कथा कशीही असली तरी मराठी प्रेक्षकांसाठी यापेक्षा महत्त्वाची आहे ती पहिलेपणाची गंमत…मराठीतला सर्वाधिक बजेटचा सिनेमा.

पहिल्यांदाच बघायला मिळणारे बॉलीवूड आणि साऊथ इंडियन सिनेमांसारखे स्टंट, सिनेमॅटाग्राफी-एडिटिंगचा दर्जाही अव्वल आणि रितेश देशमुखसारखा हिरो. केवळ हिरोसाठी प्रेक्षक सिनेमा बघायला जातायत हे गेल्या कित्येक वर्षात मराठीत घडलं नाही, जे चित्र लय भारीमुळे बघायला मिळेल. निशिकांत कामतने फोर्समध्ये जबरदस्त ऍक्शन दाखवली होती, म्हणजे ऍक्शन सीन्स त्याला नवीन नव्हते, पण या स्टंटप्रमाणे सिनेमाची लांबी, काही अनावश्यक गोष्टी, कथेमधल्या उणीवा यांच्याकडे आणखी लक्ष दिलं असतं तर खरंच एक लय भारी सिनेमाचा आनंद मिळाला असता.

नवीन काय ?

23salman_khan_laibhariलय भारीमधलं उल्लेखनीय कास्टींग आहे तन्वी आझमी यांचं…सुमित्रादेवींचा घरंदाजपणा तन्वी आझमींच्या रुपात एकदम शोभून दिसतो. आणखी एक तगडं कॅरेक्टर आहे संजय खापरेने साकारलेल्या सखाचं.. ‘काकस्पर्श’नंतर संजय खापरेचा जबरदस्त ताकदीचा अभिनय लय भारीमध्ये बघायला मिळेल. नायिका म्हणून राधिका आपटे काहीशी मिसफीट वाटते. क्लायमॅक्स जवळ येताना शृंगाररस ओतप्रोत भरलेलं गाणंही तिच्यावर चित्रीत करण्याची कल्पनाही फारशी पटत नाही.

523lai bhari शरद केळकरचा व्हिलन रांगडा आहे, दणकट आहे, फक्त अभिनयात तो थोडा अजून मागे पडल्यासारखा वाटतो. खरी कमाल आहे ती रितेश देशमुखची…फक्त कॉमेडीच नाही तर सिरीयस रोलमध्ये पण आपण कमाल करु शकतो हे ‘एक व्हिलन’मधून रितेशने दाखवून दिलेलं आहेच, आता लय भारीमधून आपण ऍक्शनस्टारही आहोत हे रितेशने पटवून दिलंय. ग्रामीण महाराष्ट्रातल्या नायकाचं रांगडेपण रितेशने उत्तम रंगवलंय. विठ्ठलाच्या मूर्तीशी गप्पा मारण्याचे प्रसंगही मस्त जमून आलेत, फक्त रोमँटिक ट्रॅकमध्ये तो थोडा अवघडलेला वाटतो.

परफॉर्मन्स

LAI BHARI 1अजय-अतुल यांनी केलेली लय भारीची गाणी हा सिनेमासाठी नक्कीच प्लस पॉईंट आहे. ‘माऊली माऊली’ हे गाणं तर आहेच, पण त्याचबरोबर सोनु निगम आणि श्रेयाने गायलेलं ‘जीव भुलला’, कुणाल गांजावालाचं ‘न्यू नवा तराणा’ आणि टायटल ट्रॅक ही मस्त ताल धरायला लावणारी गाणी आहेत. संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी अफलातूनच आहे, त्यामुळे सिनेमाला एकदम रिच लूक आलेला आहे.

कॉश्च्युम्ससुद्धा अगदी विचार करुन डिझाईन करण्यात आलेली आहेत. अगदी प्रत्येक कॅरेक्टरला सूट होतील अशी आणि आधुनिक विचार असलेली कॉश्च्युम्स आहेत. विधवाबाई असली तरी तिला पांढरी साडी दिलेली नाही हा दिग्दर्शकीय विचारही वाखाणण्यासारखा आहे. अशा काही चांगल्या गोष्टीही सिनेमात आहेत, काही न जमलेल्या गोष्टीही आहेत. फार अपेक्षा ठेवून गेलात तर तुमची निराशा होऊ शकते, पण डोकं बाजूला ठेवून बघितलात तर ऍक्शनपॅक्ड मसाला फिल्मचा आनंदही आणि तोही मराठीत मिळू शकेल.

रेटिंग 100 पैकी 50
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close