‘दादा’गिरीवर ‘काका’ भारी !

July 12, 2014 5:01 PM0 commentsViews: 2883

78sharad_pawar_on_ajit_pawar_12 जुलै : 12 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढू अशी गर्जना केली होती. मात्र ‘दादा’गिरी मोडीत काढून पुतण्यापेक्षा काकाच भारी असं पुन्हा एकदा पवारांनी अधोरेखित केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि आम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही हा निर्णय माझ्या हाती आहे. जागावाटपात 144 पेक्षा 2 जागा जास्त मिळतील किंवा कमी ही मिळतील पण विधानसभेसाठी एकत्रच सामोरं जाणार असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच जागावाटपाबाबतचा तिढा चर्चेतून सोडवू असंही पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात विधानसभा निवडणुका लागतील असं भाकितही शरद पवारांची वर्तवलंय. मुंबईत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

काका आणि पुतण्या या नात्याचं राजकारण राज्यासाठी नवीन नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्याच्या जोडीचं राजकारणात खास महत्त्व आहे. शरद पवार जुणे जाणते आणि मातब्बर राजकारणी तर अजित पवार आक्रमक आणि धाडसी नेतृत्व करणारे नेते. त्यामुळे अनेक वेळा अजित पवार थेट ‘दादा’गिरीचा मार्ग स्वीकारून धडाधड निर्णय घेऊन मोकळे होतात.

अलीकडेच ‘144 जागा मिळाल्या नाहीत तर 288 जागा लढवण्याची तयारी ठेवा’ असं अजित पवारांनी जाहीर करुन टाकलं. एवढंच नाहीतर हे आपल्याला शरद पवारांनीच आम्हाला सांगितलं असंही नमूद करायला ते विसरले नाही. त्याचबरोबर हे माझं व्यक्तीगत मत आहे की ,पक्षाचं हे काँग्रेससोबत वाटाघाटी करताना दाखवून देऊ असंही अजितदादा म्हणाले होते. पण आज मुंबईत मोठ्या पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन दादागिरी मोडीत काढली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि आम्हाला काँग्रेस बरोबर आघाडी करायची आहे की नाही हे मी ठरवणार जागावाटपात 144 पेक्षा 2 जागा जास्त मिळतील किंवा कमी ही मिळतील पण येणार्‍या निवडणुकीत एकत्रच सामोरं जाऊ असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. काँग्रेससोबत आघाडी कायम राहिल. जागावाटपाच्या प्रश्नावर केंद्रीयस्तरावर काँग्रेसबरोबर आघाडी आणि जागावाटपाची चर्चा करण्याचा आमचा आग्रह राहील असंही पवारांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांना टोला

काँग्रेसने विधानसभेसाठी आघाडीचं नेतृत्व स्वीकारण्याचा आग्रह केला होता असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी पवारांनी केलं होतं. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. खास करुन मुख्यमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. आज त्याबाबत परत पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी माझी 3 वेळा बैठक झाली, त्यात विधानसभा निवडणुकीत मी आघाडीचे नेतृत्व स्वीकारावे अशी चर्चा झाली होती. पण त्या बैठकांना मुख्यमंत्री हजर नव्हते असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

‘भुजबळांची ‘ती’ बातमी मजेशीर’

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी एका वृतपत्राने प्रसिद्ध केल्यामुळे खळबळ उडाली होती. यावर पवारांना पत्रकारांनी विचारले असता. ही बातमी मुळात मजेशीर आहे अशी खिल्ली पवारांनी उडवली. भुजबळांसंदर्भातील ही बातमी टेबल न्यूज आहे हे फावल्या वेळेतलं काम आहे असंही पवार म्हणाले.

(सविस्तर बातमी लवकरच )

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close