‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ !’

July 12, 2014 9:05 PM0 commentsViews: 2164

 412mumbai_miss_girl_pkg

12 जुलै : मायानगरी मुंबईच्या आकर्षणापायी अनेक किशोरवयीन मुलं-मुली मागचा पुढचा विचार न करता थेट या महानगराचा रस्ता धरतात. इथं आल्यानंतर त्यांना स्वप्नातील मुंबई आणि प्रत्यक्षातील मुंबई यांच्यात फरक असल्याचं जाणवतं. त्यापैकी काही सुदैवी मुलांनाच पुन्हा स्वतःच्या घरी परतण्याचा मार्ग सापडतो. अलाहाबादमधल्या 2 किशोरवयीन मुलींना अशाच प्रकारे स्वतःच्या घरी जाता आलं.

13 वर्षांची ज्योती निलाद आणि 15 वर्षांची काजल निलाद या अलाहाबादमधल्या मुली. त्यांच्या वयाच्या लाखो मुला-मुलींप्रमाणे त्यांनाही मुंबईच्या तारे-तारकांचं आकर्षण होतं. आपणही त्यांना भेटावं, जमल्यास त्यांच्यासारखं व्हावं असं स्वप्न रंगवत, घरातल्या कोणालाही न सांगता त्या 24 जुनला मुंबईला जाणार्‍या ट्रेनमध्ये बसल्या. मात्र, मुंबईला पोहोचण्याआधीच कल्याणलाच गाडीमधून उतरल्या. तिथं रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि भिवंडीतल्या बालसुधारगृहात पाठवलं.

दरम्यान, पोलिसांनी ज्योती आणि काजल यांच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि त्यांना मुंबईला बोलावून घेतलं. ग्लॅमरच्या भुलाव्यात वाहवत जाऊन ज्योती आणि काजलनं स्वतःहून संकटाला आमंत्रण दिलं होतं. पोलिसांच्या खबरदारीमुळे त्या सावरल्या. पण त्यांच्यासारख्या मुंबईला निघून येणार्‍या मुला-मुलींचं काय हा प्रश्न उरतोच.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close