ज्यांना शिवसेनेत यायचंय त्यांनी वेळेत यावं – उद्धव ठाकरे

July 13, 2014 4:49 PM0 commentsViews: 3078

uddhav thackray

13  जुलै : ज्यांना शिवसेनेत यायचंय त्यांनी वेळेत यावं अन्यथा शिवसैनिक भगवा फडकावण्यास समर्थ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शिवबंधन मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भुजबळ आणि केसरकर यांना टोला लावला. ज्यांना शिवसेनेत यायचंय त्यांनी निधड्या छातीनं यावं, उगीच येऊ का, येऊ का असं विचारत बसू नये. अन्यथा शिवसैनिक भगवा फडकावण्यास समर्थ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आघाडीचा संसार बिघडण्याच्या वाटेवर आहे, आता फक्त महायुती समर्थ सरकार देऊ शकते. पक्षात येणार्‍यांचा पूर्व इतिहास पाहूनच पक्षप्रवेशाबद्दल निर्णय घेणार असून चांगल्या वृत्तीच्याच लोकांना प्रवेश देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आजच राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. केसरकरांच्या पाठोपाठ छगन भुजबळही शिवसेनेत जाणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, भुजबळ आणि केसरकर यांच्या शिवसेनाप्रवेशाबद्दल बोलताना शिवसेनेत कुणाला घ्यायचं याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ यांनीच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला वेळोवेळी त्रास दिला, त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही राऊत म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close