पाण्याची टंचाई, बैठकांचा पूर आणि गुरांचा बाजार…

July 13, 2014 6:58 PM2 commentsViews: 1375

dipti_raut_ibn_lokmat_nashik- दीप्ती राऊत , ब्युरो चीफ,IBN लोकमत

गेल्या आठ-दहा दिवसांत नाशिकमध्ये टंचाईच्या सलग चार आढावा बैठका घेण्यात आल्या. पहिली बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. पुन्हा मुख्य सचिवांची एक बैठक झाली आणि शेवटी राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम याचा टंचाई आढाव्याचा दौराच झाला. कृषी, पाणीपुरवठा, महसूल, रोहयो आदी संबंधित प्रमुख खात्यांचे सचिव, विभागातले पाचही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि बराच लवाजमा… औरंगाबाद झालं, नाशिक झालं आणि नंतर पुणे… सरकारी छापाची आकडेवारी… कुठे किती टँकर सुरू आहेत आणि कुठे रोहयोचे किती मजूर उपस्थित आहेत… दुबार पेरण्यांचं संकट लोकांनी पेलायचं कसं… यावर मंत्रीमहोदयांचं उत्तर.. हा प्रश्नच उदभवत नाही. कारण अवघ्या ६ टक्के पेरण्या झाल्यात. पुढे महत्त्वाची टिपण्णी… राज्यात पुरेसा पाणीसाठा आणि भरपूर चारा उपलब्ध आहे…

मंत्रीमहोदयांच्या या आकडेवारीत एकच आकडेवारी नव्हती… ती म्हणजे आजही गुरांच्या बाजारात विकण्यासाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांची संख्या. मंत्रीमहोदयांचा ताफा ज्या रस्त्यानं मुंबईकडे रवाना झाला त्याच रस्त्यात नाशिक सोडल्यावर अवघ्या ३० किलोमीटरवर एक गाव लागतं. घोटी, इगतपुरी तालुक्यातली महत्त्वाची बाजारपेठ. पंचक्रोशीतल्या आदिवासी गावांनी वेढलेलं. तांदळाचं कोठार समजलं जाणारं. संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचं गाव. दर शनिवारी घोटीत आठवडी बाजार भरतोय. त्यावेळेसच गुरांचा बाजारही.

dangi cow

दरवर्षी मे महिन्यात  गुरांचा हा बाजार संपतो. पण यंदा तो अजूनही सुरू आहे. भर जुलैमध्ये भरला जाणारा हा गुरांचा बाजार म्हणजे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं भयानक उदाहरण. खरं तर खरीप हाच या परिसरातला एकमेव आधार. पण यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे भाताची सारी रोपं करपून गेलीत. राब जळालेत. पुन्हा पेरायला हातात पैसा आणि जनावरांना खायला चारा नाही. त्यामुळे त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर या तिन्ही तालुक्यातले लहान शेतकरी त्यांची जनावरं विकण्यासाठी बाजारात घेऊन येताहेत.

७ जूनला ३७१ जनावरांची घोटी बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली, १४ जूनला ३०८, २१ जूनला १९७, २८ तारखेला २०७ आणि परवाच्या ५ जुलैला १०७… एन जुलैच्या मध्यावरचं हे भयाण चित्र… शेतात नांगराला असायला हवीत ती जनावरं गुरांच्या बाजारात उभी होती… केविलवाणी आणि हतबल… चाऱ्याआभावी खपाटीला पोटं गेलेली जनावरं आणि गिऱ्हाईकाची वाट बघत बसलेले त्यांचे तेवढेच दीनवाणे मालकही.

dangi cow igatpuri

६० हजारांची जोडी ही… आज २० हजारालाही विकली जात नाहीए… सिन्नरहून आलेले भाऊ थोरे सांगत होते. काळजावर दगड ठेवून विकायला आणलेली बैलाची जोडी ते परत घेऊन चालले होते. त्र्यंबकचे रामदास असवारी येईल त्या किमतीला बैल विकायला तयार होते. बैल परत नेण्याचं भाडं त्यांना परवडणारं नव्हतं. रामदास भाऊ सांगत होते, सारी रोपं करपतीलत. १० किलोची बियाण्याची पिशवी १ हजार रुपयांना आणलेली. पुन्हा उधारउनवारी करून त्यांना रोपं आणावी लागणार आहेत. दरवर्षी ते ३ एकरावर ३५ पोती भात घेतात. यंदाचा काहीच भरोसा नाही.

मुसळधार पावसाचा हा पट्टा. इगतपुरीपासून भंडारदाऱ्यापर्यंतचा. त्या मुसळधार पावसात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उतारावरच्या भातशेतीसाठी जणू निसर्गानंच खास तयार केलेली डांगी जनावरं. काळ्याकबऱ्या पाठीची, तेलकट त्वचेची आणि आखूड खुरांची. या परिसरातली खास गावरान जात. पण यंदा शेताएेवजी बाजारात आलीत. जनावरांना चारा नाही… नांगराला बैल नाही… गेल्या महिनाभरात या एका बाजारात हजारेक गुरं विकली गेलीत. अजून बाजार सुरूच आहे… पण सरकारी टंचाईच्या आढावा बैठकांमध्ये कुठेच त्यांची नोंद नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Yogesh Gaikwad

    उशिरा का होइना चांगला पाऊस होइल. सरकारी आकडे धुतले जातील … मुद्दल फिटण्या इतपत काळी आई नक्की देईल… व्याजाचं ते आपापसात पाहुन घेतील… TV वाल्या ताई जमलं तर थोडा धीर द्या.

  • Amir

    Same case in western maharashtra like solapur, sangli district

close