राज्यासह देशभरात दुष्काळाचं सावट

July 13, 2014 8:36 PM0 commentsViews: 439

रूपश्री नंदा, नवी दिल्ली

13  जुलै :   राज्यावर दुष्काळाचं सावट पडलंय. तशीच काहीशी स्थिती संपूर्ण देशाची झालीय. 14 जुलैला मान्सून पुन्हा सक्रिय होईल अशी माहिती वेधशाळेनं दिलीय. पण आतापर्यंत संपूर्ण देशात पाऊस पोहोचायला हवा होता. पाऊस नसल्यानं देशात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

जवळपास अर्धा जुलै महिना संपलाय. अजूनही पाऊस संपूर्ण देशात पोहोचलेला नाही. आतापर्यंत पाऊस सरासरीपेक्षा 43 टक्के कमी झालाय. देशातलं 60 टक्के धान्य खरीप हंगामात पिकतं आणि देशातली 65 टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. धान्याची कोठारं म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंजाब आणि हरियाणालाही कमी पावसाचा फटका बसतोय.

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील असं केंद्र सरकारनं यापूर्वीच संसदेत स्पष्ट केलंय.

दुष्काळाशी लढा

 • केंद्र सरकारनं 500 जिल्ह्यांसाठी आकस्मिक योजना आखलीय.
 • लवकर अंकुर फुटणारी आणि दुष्काळात तग धरून राहणारी बियाणं उपलब्ध करून देण्यावर सरकारनं लक्ष केंदि्रत केलंय.
 • सिंचनासाठी हातपंपांची दुरुस्ती आणि विजेची तजवीज करण्यावर भर दिला जातोय.
 • आणीबाणीच्या स्थितीसाठी राज्यांना कृषी विकास योजनेंतर्गत 10 टक्के निधी बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय.

सध्या देशात गहू आणि तांदळाचा साठा पुरेसा आहे. पण धान, तेलबिया, डाळी आणि भरड धान्याच्या लागवडीसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. यंदा लागवडीखालची जमीन गेल्या वर्षीपेक्षा बरीच कमी आहे. त्यामुळे हे वर्ष शेतकर्‍यांसाठी कसोटीचं ठरणार आहे.

जून आणि सप्टेंबर या कालावधीत पावसाची स्थिती पाहूनच हवामान खातं दुष्काळी स्थिती जाहीर करते. त्यामुळे अजून तरी आशेला वाव आहे. देशात जवळपास सर्वत्र पाऊस सरासरीपेक्षा कमी झालाय. एक नजर टाकूयात…

दुष्काळाचं सावट, सरासरीपेक्षा कमी पाऊस

 • पंजाब – 54 टक्के कमी
 • हरियाणा – 50 टक्के कमी
 • पश्चिम राजस्थान – 67 टक्के कमी
 • पूर्व राजस्थान – 74 टक्के कमी
 • गुजरात – 93 टक्के कमी
 • सौराष्ट्र – 84 टक्के कमी
 • मध्य महाराष्ट्र – 70 टक्के कमी
 • मराठवाडा – 61 टक्के कमी
 • विदर्भ – 68 टक्के कमी
 • पश्चिम मध्य प्रदेश – 74 टक्के कमी
 • पश्चिम उत्तर प्रदेश – 71 टक्के कमी
 • छत्तीसगड – 55 टक्के कमी
 • ओडिशा – 52 टक्के कमी
 • तेलंगणा – 55 टक्के कमी
 • आंध्र प्रदेश किनारपट्टी – 51 टक्के कमी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close