अर्जेंटिनाचा पराभव करत जर्मनी ठरली वर्ल्ड चॅम्पियन

July 14, 2014 9:32 AM0 commentsViews: 669

Football world cup winner

14   जुलै :  जगभरातल्या कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार्‍या जर्मनीने अर्जेंटिनावर 1-0ने मात करत जगज्जेतेपद पटकावलं आहे. जर्मनीने तब्बल 24 वर्षांनंतर विश्वचषकावर चौथ्यांदा आपले नाव कोरलं आहे.

यजमान ब्राझीलला 7-1ने धूर चारून जर्मनीने फायनलमध्ये धडक मारली होती, तर नेदरलँडवर पेन्लटी शूटआऊटमध्ये मात करत अर्जेंटिना फायनलमध्ये पोहोचली होती. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी जर्मनी विरूद्ध अर्जेंटिना असा सामना रंगला. मॅचच्या निर्धारित वेळेत म्हणजे 90 मिनिटांमध्येही दोन्ही टीमची पाटी कोरीच राहिली होती. त्यानंतर 30 मिनिटांचा एक्स्ट्रा टाईम देण्यात आला आणि यामध्ये 113व्या मिनिटाला जर्मनीच्या मारियो गोएत्झने मॅच शानदार विनिंग गोल करत अर्जेंटिनाला जबरदस्त धक्का दिला. या गोलमुळे जर्मनीचा विजय जवळपास निश्चित सामजला जात होता. पण सामना संपायला दोन मिनीटं बाकी असताना अर्जेंटिनाला फ्री किक मिळाली होती.

अर्जेंटिनाचा जादूई प्लेयर लिओनल मेस्सीला या किकवर गोल करण्यात अपयश आलं आणि जर्मनीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या वेळेला फुटबॉल वर्ल्ड कप जिकंलेल्या जर्मनीच्या फॅन्सनी एकच जल्लोष केला. यापूर्वी 1954, 1974 आणि 1990 वर्ल्ड कपही त्यांनीच जिंकला होता.

पुरस्कारांच्या मानकर्‍यांमध्ये यंदाही गोल्डन बूटसाठी मोठी चुरस होती, कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जनं गोल्डन बूट पटकावला आहे. तर अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल मिळाला आहे. मेस्सीचा हा चौथा वर्ल्ड कप होता. या वर्षी त्याची जादू म्हणावी तशी चालली नाही, त्याला फक्त 4 गोल करता आले, त्याशिवाय काही महत्त्वाच्या गोलनाही त्याचा पाय लागला होता. प्लेअर ऑफ द टुर्नानेंटचा मान त्यानंच पटकावला. या विजयाबरोबर दक्षिण अमेरिकन खंडात वर्ल्ड कप जिंकणारा जर्मनी हा पहिला युरोपियन देश ठरला.

पुरस्कारांचे मानकरी

  • गोल्डन बूट – जेम्स रॉड्रिग्जनं ( कोलंबिया) – 6 गोल
  • गोल्डन ग्लोव्ह – मॅन्युअल नोया (गोलकिपर, जर्मनी) – 25 सेव्ह
  • गोल्डन बॉल – लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
  • फिफा फेअर प्ले अवॉर्ड – टीम कोलंबिया
  • फिफा यंग प्लेअर अवॉर्ड – पॉल पोग्बा (फ्रान्स)
  • फिफा प्लेअर ऑफ द टुर्नानेंट – लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close