बळीराजा संकटात, विकतोय आपली जनावरं !

July 14, 2014 6:07 PM0 commentsViews: 445

दीप्ती राऊत, नाशिक

14 जुलै : जनावरांना खायला चारा नाही आणि दुबार पेरण्यांसाठी हातात पैसा नाही. या कात्रीत सापडलेला शेतकरी जनावरंच विकायला बाजारात आणत आहेत. हे विदारक चित्र आहे नाशिक जिल्ह्यातल्या घोटीतलं. भाताचं कोठार समजल्या जाणार्‍या या तालुक्यांमध्ये भाताची रोपं करपलीत. जनावरांना चारा नाही पावसाला झालेल्या विलंबामुळे शेतकर्‍यांना त्यांची गुरं बाजारात विकायला आणावी लागत आहेत.

दर वर्षी मे महिन्यात बंद होणारा घोटीतला हा गुरांचा बाजार यंदा जुलैमध्येही सुरू आहे. गेल्या महिनाभरात इथे तब्बल बाराशे गुरं शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणली होती. उतारावरच्या शेतीसाठी मुसळधार पावसात उपयोगी पडणारी ही डांगी जनावरं. मालकाचं शेत नांगरण्याऐवजी यंदा गुरांच्या बाजारात उभी आहेत. केवीलवाणी आणि हतबल. सोबत त्यांचे मालक शेतकरीही तितकेच आगतिक. “काय करणार पाऊस नाही, पेरण्या जळाल्या, जनावरांना चारा नाही म्हणून इथं आणले विकायला” अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.

इतरांच्या दाण्याची व्यवस्था करणार्‍या शेतकर्‍याच्या गुरांनाही यंदा चारा नाही. घोटीच्या बाजार..भाताचं कोठार समजलं जाणारा हा बाजार दरवर्षी मे मध्ये बंद होतो. पण यंदा जुलै उलटला तरी सुरू आहे. शेतकर्‍यांची जनावरं जी यावेळी शेतात नांगराला हवी होती ती बाजारत आणावी लागलीत. “पेरण्या जळून गेल्या म्हणून वापायला आणलं, पाऊस पडत नाही, वैरण नाही. आमच्या गावात दुष्काळ आहे, चारा नाही, पाणी नाही म्हणून आणलं विकायला” असा पाढाच जनावरांच्या मालकांनी वाचला.

“पाणी नाही, चारा नाही. 60 हजाराला ही जोडी घेतलेली.. आज 20 हजारही येईनात” हातातलं जनावर विकायला आणायचं तेही काळजावर दगड ठेऊन पण त्याचाही सौदा नुकसानीतला अशी व्यथा शेतकर्‍यांची झालीय.

खरेदीला गिर्‍हाईक नाही आणि नांगराला बैल नाही. लांबलेल्या पावसाचे परिणाम भोगणारा हवालदिल शेतकरी..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++