दहशतवाद्याशी गुफ्तगू, संसदेत गदारोळ

July 14, 2014 11:31 PM0 commentsViews: 77

Hafiz-Saeed-14 जुलै : योगगुरू रामदेव बाबांचा सहकारी आणि पत्रकार वेद प्रताप वैदिकने हाफीझ सईदची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून आज (सोमवारी) संसदेमध्ये भाजपला घेरण्यात आलं. 2 जुलैला वेद प्रताप वैदिकने 26-11 चा मास्टरमाईंड हाफीझ सईदची भेट घेतली होती. वैदिकना ही भेट घेण्यासाठी सरकारी परवानगी नव्हती असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलंय पण काँग्रेसने या प्रकरणी विस्तृत उत्तरांची मागणी केली आहे.

एका बाजूला जगातला मोस्ट वॉटेंड दहशतवादी हाफीझ सईद आणि दुसर्‍या बाजूला रामदेव बाबांचे सहकारी आणि पत्रकार वेद प्रताप वैदिक. वैदिक हे विचारवंतांची संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल हेसुद्धा या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे या भेटीची जास्त चर्चा होतेय.

पण काँग्रेसला मात्र हे स्पष्टीकरण मान्य नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो संसदेत गोंधळ माजवायला पुरेसा होता. या गोंधळानंतर केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं. या दरम्यान, जमात उद दावाचा प्रमुख हाफीझ सईदने यासंदर्भात स्वतःच ट्विट करून या भेटीसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाचा निषेध केलाय.

हाफीझ सईद ट्विटर म्हणतो, दुदैर्वाने, तथाकथित निधर्मी भारतातल्या पत्रकाराने, वैदिक यांनी घेतलेली ही भेट देशाच्या पचनी पडत नाहीय. भारताच्या संकुचित वृत्तीचं हे उदाहरण आहे.

आश्चर्य म्हणजे, या प्रकरणी समाजवादी पक्ष आणि बसपने या प्रकरणी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादीने मात्र भाजपला या प्रकरणी पाठिंबा दिलाय.

काँग्रेसला या सगळ्या प्रकरणाबद्दल अधिक माहिती हवीय. ही भेट कशी झाली, कोणी घडवून आणली आणि त्या दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याची उत्तरं काँग्रेसला हवी आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दहशतवाद्याला भेटणारा पत्रकार एकाच संघटनेचे सदस्य असल्याने त्यांनी या प्रकरणी अधिक आक्रमक पवित्रा घेतलाय.

कोण आहेत वेद प्रताप वैदिक?

– दिल्लीमधल्या विवेकानंद फाउंडेशन या थिंक टँकचे सदस्य
– राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या विवेकानंद फाउंडेशनचे प्रमुख होते
– 2 वर्षांपूर्वी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान वेद प्रताप वैदिक हे भाजप आणि रामदेव बाबा यांच्या दरम्यान महत्त्वाचा दुवा होते
– लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांशी जवळचे संबंध
– पाकिस्तानला गेलेल्या शिष्टमंडळात वैदिक यांचा समावेश होता

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close