वैदिक देशद्रोही, अटक करा -उद्धव ठाकरे

July 16, 2014 6:15 PM0 commentsViews: 372

udhav_on_pratap vaidik16 जुलै : 26/11 मुंबई स्फोटातील मास्टरमाईंड हाफीज सईद आणि वैदिक यांची भेट हा देशद्रोहच आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच याभेटी वेळी त्यांच्या सोबत कोण कोण होते याची चौकशी व्हावी तसेच वैदिक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव येथे केले. ते सेनेच्या बूथप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकार्‍याच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप असतांना ते मोकाट फिरतात आणि आ. सुरेश जैन यांना फक्त शिवसेनेचा असल्याने त्यांना गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात सडत आहेत हा कुठला न्याय अशी टीकाही उद्धव यांनी केली. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी त्यांच्या परिवाराची घेतलेली भेट म्हणजे विधान परिषदेत सुरेश जैन यांना उमेदवारी मिळणार का ? अशी चर्चा सुरू झाली. तसंच अजित पवार यांच्या मागणीवरून स्वीट डिश न पुरवू शकणार्‍या अधिकार्‍यांवर बडतर्फची कारवाई झाली आणि जळगावचे जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाही त्यांच्यावर का कारवाई होत नाही असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला. दरम्यान, आज शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातूनही हाफीज-वैदिक भेटीवर टीका करण्यात आली. भारतविरोधी भयंकर कारवाया करणार्‍या हाफीझ सईदला भेटणं हा देशद्रोहच आहे, अशी भूमिका सामनामध्ये घेण्यात आली.

सामनाच्या संपादकीयामध्ये 

“हाफीझ सईद हा नुसता दहशतवादीच नाही तर भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा तोच खरा मास्टरमाइंड आहे. शेवटी प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. आज जर केंद्रात काँग्रेसचं राज्य असतं आणि त्या राजवटीत जर एखादा अवसानघातकी पत्रकार दाऊद इब्राहिम किंवा हाफीझ सईदला भेटला असता तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सरकारला जाब विचारणारीच भूमिका घेतली असती हे मान्य करावे लागेल. या भेटीशी सरकारचा संबंध नाही एवढाच खुलासा पुरेसा नाही. भारताविरुद्ध भयंकर कारस्थान रचणार्‍या हाफिझला अशाप्रकारे भेटणे हा देशद्रोहच आहे,त्याविरुद्ध सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close