आपलंच घर पोखरायला नक्षलवाद्यांना परदेशातून रसद !

July 16, 2014 9:57 PM0 commentsViews: 933

16 जुलै : भारतात गेल्या काही महिन्यांत भीषण नक्षलवादी हल्ले झाले. या नक्षलवाद्यांना आर्थिक मदत कुठून मिळते यावर चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळालीय. भारतातल्या नक्षलवाद्यांला जगभरातील आंतराष्ट्रीय संघटनांनी मदत केलीय.

दिल्ली विद्यापीठाचा इंग्रजीचा प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अटक झाली. साईबाबाच्या घरी धाड टाकून पोलिसांनी काही कागदपत्रं आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतल्या. या कागदपत्रांतून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातल्या नक्षलवाद्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेटवर्क उघड झालंय. या नेटवर्कमध्ये जगभरातल्या माओवादी संघटना आहेत आणि भारतातले नक्षलवादीही याच नेटवर्कचा भाग आहेत. याचा भारतातला सूत्रधार आहे साईबाबा.

नक्षलवाद्यांच्या या नेटवर्कचं नाव आहे… ब्लॅक माओइस्ट फेडरेशन. बोलिव्हियो, चिली, ब्राझील, तुर्कस्तान, मेक्सिको, फिलिपाईन्स या देशांचा यात समावेश आहे. स्वीडनच्या जॉन मेड्राले या व्यक्तीने भारतातल्या माओवाद्याना बाहेरून पाठिंबा आणि मदत मिळवून देण्यासाठी ‘सपोर्ट पीपल्स वॉर इन इंडिया’ असाही एक गट तयार केलाय. या गटात जर्मनी फ्रान्ससह इतर देशातल्या दीडशेपेक्षा जास्त तरुणांचा समावेश आहे. माओची क्रांती जगभर पोचवण्याची या तरुणांची महत्त्वाकांक्षा आहे.

भारतातल्या नक्षलवाद्यांना सपोर्ट पीपल्स वॉर इन इंडिया या नेटवर्कच्या माध्यमातून परदेशी निधी मिळतो, अशी गृह मंत्रालयाची माहिती आहे. फिलीपाईन्स आणि तुर्कस्तानातल्या कम्युनिस्ट संघटनांशीही भारतातल्या माओवाद्यांचे संबंध आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ फिलीपाईन्सतर्फे या नक्षलवाद्यांना 2005 आणि 2011 मध्ये प्रशिक्षणही देण्यात आलंय. जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इटलीमधूनही या नक्षलवाद्यांना आर्थिक पाठबळ आणि शस्त्रास्त्र मिळाल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्या त्या देशांकडे राजनैतिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित केलाय.

ब्लॅक माओइस्ट फेडरेशन

  • बोलिव्हियो
  • चिली
  • ब्राझील
  • तुर्कस्तान
  •  मेक्सिको
  • फिलिपाईन्स

नक्षलवाद्यांना पाठबळ
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ फिलिपाईन्सतर्फे नक्षलवाद्यांना प्रशिक्षण
- जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इटलीमधूनही आथिर्क पाठबळ आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा

close