अजब बंगल्याची गजब कहाणी, मौल्यवान ठेवा नष्ट !

July 17, 2014 4:56 PM0 commentsViews: 1065

21central_museum_nagpur17 जुलै : मध्य भारतातील एकमेव आणि अजब बंगला या नावाने प्रसिद्ध असणार्‍या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयातील अतिशय दुर्मिळ अशा पेंढा भरलेल्या वन्यप्राण्यांची 1236 ट्रॉफीज संग्रहालयातील क्युरेटरनी (अभिरक्षक) नष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

ब्रिटीशकालीन 150 वर्षे जुन्या या संग्रहालयात शंभर वर्षांपेक्षाही जास्त जुन्या अशा 1,290 ट्रॉफीज होत्या. संग्रहालयात आतापर्यंत किती ट्रॉफीज आहेत यांसंदर्भात आरटीआयमध्ये माहिती मागवण्यात आली होती.

यात यापैकी 1,236 ट्रॉफीज नष्ट करण्यात आल्याची आणि फक्त 54 ट्रॉफीजच असल्याची माहिती आरटीआयमध्ये संग्रहालयाचे क्युरेटर मधुकर कठाणे यांनी दिली आहे.

2003 मध्ये संग्रहालयाच्या नुतनीकरणादरम्यान अनेक ट्रॉफीज कुजल्यामुळे त्या नष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. वाईल्ड लाईफ ऍक्ट नुसार अशा ट्रॉफीज बाळगतांना आणि त्या नष्ट करतांना वनविभागाची परवानगी घ्यावी लागते पण मध्यवर्ती संग्रहालयातील ट्रॉफीज नष्ट करताना अशी परवानगी घेण्यात आली नव्हती. यासंदर्भात वनविभागाने चौकशीही सुरू केली आहे.

वनविभागाचे कार्यालय हे मध्यवर्ती संग्रहालयाच्या समोरच असतांना एवढ्या मोठ्या ट्रॉफीज नष्ट होतांना त्यांची माहितीही वनविभागाला मिळाली नाही हे मोठे आश्चर्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ट्रॉफीजना मोठी किंमत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखल चौकशी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

 काही प्रश्न
- नूतनीकरण करताना काळजी का घेण्यात आली नाही?
- दुर्मीळ ट्रॉफीजची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाला का?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close