राज ठाकरे यांचं किणी प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

April 27, 2009 4:29 PM0 commentsViews: 65

27 एप्रिलराज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेलं किणी खून प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. या प्रकरणाबाबत राज यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करा, अशी मागणी ठाण्यातले शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी केली आहे. रविवारी ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी चौगुले यांच्यावर टीका केली होती. चौगुले यांच्यावर खुनाचा आरोप असताना शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. हेच चौगुले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी जाधव खून प्रकरणात चौगुले यांना 'जेल दाखवण्याचं' आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं, असं राज ठाकरे यांनी काल रविवारी जाहीर सभेत सांगितलं. पुराव्यादाखल त्यांनी स्टेजवर जाधव कुटुंबियांना हजर केलं होतं. 'राज ठाकरे यांचाही किणी खून प्रकरणाशी संबंध होता मग त्यांच्यावर असा गुन्ह्याचा आरोप असतानाही आज ते निवडणुकीच्या रिंगणात मनसे अध्यक्ष म्हणून उभे आहेत. त्यामुळे स्वत: आरोपीच्या पिंजर्‍यात उभे असताना माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा त्यांना काय अधिकार आहे?', असा सवाल ठाण्यातले शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी केला आहे. तसंच राज ठाकरे यांनी केलेलं हे विधान म्हणजे एकप्रकारे राष्ट्रवादीने दिलेली राजकीय सुपारीच आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर या राजकीय पक्षांतील आरोपप्रत्यारोपांचं राजकारण पाहता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राजकारणात दुसर्‍यावर आरोप करण्यापूर्वी आपला राजकीय इतिहास तपासून पाहावा असा टोला त्यांनी राज ठाकरे यांच्याठाण्यातल्या प्रचारसभेत लगावला.

close