नाराज नारायण राणे जाणार कुठे ?

July 17, 2014 11:31 PM0 commentsViews: 4150

naryan rane on nitish twit17 जुलै : काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज पत्रकारांच्या समोर त्यांनी याबाबतची घोषणा केली. मंत्रिपदाचा राजीनामा देणार असलो, तरी काँग्रेस सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र नारायण राणे काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असं जरी म्हणत असले तरी राणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

गेल्या आठवड्यात नारायण राणे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नवे अध्यक्ष अमित शाह यांची देखील भेट घेतल्याचं बोललं जातंय. पण तुर्तास शिवसेनेला दुखवायची भाजपची इच्छा नसल्यामुळे राणे काँग्रेसमध्येच राहतील. पण महायुतीत जेव्हा जागावाटपावरुन वाद निर्माण होईल, तेव्हा राणेंचा भाजपप्रवेश होईल. राणेंचा भाजपप्रवेश झाल्यास शिवसेना स्वत:हून भाजपबरोबरची युती तोडेल, अशी भाजपच्या नेत्यांची योजना आहे, असं राणेंच्या गोटातून सांगण्यात येतंय.

दरम्यान, भाजपच्या मनातलं काळंबेरं ओळखूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं ठणकावून सांगण्यास सुरूवात केलीय. बाळासाहेबांना त्रास देणार्‍यांना शिवसेना तर प्रवेश देणार नाही पण भाजपनेही युतीचा धर्म पाळून राणेंना पक्षात घेणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नारायण राणेंना आरपीआयमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय.

राणे नेमकं काय म्हटलंय?
“मी माझ्या मंत्रीपदाचा सोमवारी राजीनामा देणार. पण पक्ष सोडणार नाही. माझ्या नाराजीचं कारण मी सिंधुदुर्गात गेल्यावर सांगेन.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close