राणेंचा ‘प्रहार’, ‘बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरे यांनीच केला’

July 18, 2014 6:13 PM0 commentsViews: 6455

narayan rane balasaheb thackeray and uddhav

18 जुलै : मी साहेबांच्याजवळ होतो, जर बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ जर कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनीच केलाय. मीनाताई आणि बाळासाहेबांना उद्धव यांनी मानसिक त्रास दिला त्यांचा छळ केला अशी घणाघाती टीका काँग्रेसचे बंडखोर नेते आणि एकेकाळचे शिवसेनेचे नेते नारायण राणे यांनी केली. तसंच उद्धव यांनी वैचारिक पातळी, संयम सोडलाय त्यामुळे ते असे बोलत आहे. जर पुन्हा माझ्या वाट्याला गेले तर पुन्हा वस्त्रहरण करेन असा इशाराही राणे यांनी दिला. राणे यांनी आज (शुक्रवारी) रत्नागिरीत ‘वस्रहरण’ पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडवण्याचा इरादा पक्का केलाय. मुंबईत राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आज नारायण राणे कोकणात परतले. राणे यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधत असताना संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वस्त्रहरण करणार असं जाहीर केलं. ठरल्याप्रमाणे राणे यांनी रत्नागिरीत हातखंबा इथं पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे यांनी उद्धव यांचा एकेरी उल्लेख करुन एकच हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंनी वैचारिक पातळी आणि संयम सोडलाय म्हणून वाटेल ती बडबड करत आहे. म्हणे राणेंना भाजपने प्रवेश देऊ नये. आता हे कोण सांगणारे ज्यांना स्वत:चा पक्ष नीट सांभाळता येत नाही त्यांनी दुसर्‍याच्या पक्षात डोकावून पाहु नये. उद्धव म्हणतात, कोकण भयमुक्त करणार ? कसलं भयमुक्त आणि कसलं काय ? या कोकणात त्यांनी येऊन पाहावं मग कळेल. पण हे आले तर दोनच ठिकाणी येऊन थांबता आणि पाय लावून परत मुंबईकडे पळत सुटता. कोकणाचा विकास काय असतो हे तरी माहिती आहे का ? यांना कसला विकास माहिती नाही, ना काम हे कसले काम करणार ?, कधी कोकणाच्या जनतेसाठी काही केलंय का ? त्यांच्या सुख दुखात कधी सहभागी झालात का ? असे सवाल राणेंनी उपस्थित केले.

‘उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना छळलं

राणे एवढ्यावर थांबले नाही, मी शिवसेनेत 39 वर्ष होतो. साहेबांच्या सर्वातजवळ होतो. बाळासाहेबांना मानसिक त्रास हा उद्धवनेच दिला. त्यांचा आणि मीनाताईंचा सर्वाधिक छळ हा उद्धवनेच केला. जर हे जाणून घ्यायचेच असेल तर साहेबांच्या जवळच्या माणसांना विचारा आता मला वडे वगैरे काही काढायची नाही अशी विखारी टीकाही राणेंनी केली. मी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा 290 शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस संरक्षण घेतलं होतं अशी आठवणही राणेंनी करुन दिली. महापालिकेची सत्ता गेली तर उद्धवच्या पोटापाण्याचा प्रश्न बिकट होईल असा टोलाही राणेंनी लगावला.

विधानसभेत मोदी फॅक्टर चालणार नाही

तसंच शिवसेनेचे नेते कर्तृत्व शून्य आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले त्यामुळे त्यांनी गैरसमज करुन घेऊन नये, मोदी फॅक्टर लोकसभेत चाललं पण विधानसभेत चालणार नाही असंही राणे म्हणाले. तसंच नितीन गडकरी यांची भेट झाली होती असा खुलासाही राणेंनी केला. आपण मंत्रिपदाचा राजीनामा का दिला, पक्षावर का नाराज आहे हे सोमवारीच स्पष्ट करू असंही राणेंनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close