सुसंगत निर्देशांक तयार करण्याची गरज

April 27, 2009 5:43 PM0 commentsViews: 7

27 एप्रिल, मुंबईऋतुजा मोरेसध्याचा महागाई दर हा 0.26% आहे. गेल्या वर्षी 12 टक्क्यांपर्यंत गेलेला महागाई दर आता अर्ध्या टक्क्यांच्याही खाली गेला आहे. त्यामुळं महागाई दर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय. म्हणूनच अर्थतज्ज्ञांनी महागाईशी सुसंगत असा महागाईचा निर्देशांक तयार करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडलेलेच दिसतात. मग ही तफावत का असा प्रश्न पडतो. महागाई दर हा होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच्या आधारावर मोजला जातो. होलसेल प्राईस इंडेक्स सध्या 0.3 टक्के आहे. तर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स सध्या 9.30 टक्के आहे. महागाई दर कमी होणं म्हणजे वस्तू महाग होण्याचा दर कमी होणं.महागाई दर शून्य टक्क्यांपर्यंत पोहचला याचा अर्थ जीवनावश्यक वस्तूंचे दर त्याप्रमाणात वाढत नाहीत. जागतिक स्तरावर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स मोजला जातो. तर भारतात होलसेल प्राईस इंडेक्स मोजला जातो. होलसेल प्राईस इंडेक्स हा होलसेल मार्केटमधल्या वस्तूंच्या किंमतीवर आधारित असतो. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा ग्राहकांच्या खरेदीक्षमतेवर आधारलेला असतो. ग्राहक हा मार्केटमधला राजा आहे असं म्हटलं जातं.त्याशिवाय महागाई दर कमी झाला तर बँकांनाही व्याजदर कमी करण्याची संधी मिळते. आणि व्याजदर कमी झाले तर व्यापार्‍यांना कर्ज सहज उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेलाही चालना मिळायला मदत होते, असं अर्थतज्ज्ञ आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केलंय. त्यामुळं ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर आधारित असलेल्या महागाईशी सुसंगत निर्देशांक तयार करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.

close