राणेंच्या मनसे प्रवेशाचा निर्णय राज ठाकरेंच्या हाती -नांदगावकर

July 19, 2014 9:14 PM0 commentsViews: 7199

02bala_nandgaonkar_19 जुलै : नारायण राणे हे चांगले राजकारणी आहेत ते चांगले संघटक आहे. पण त्यांना मनसेमध्ये प्रवेश द्यायचा की नाही हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील असं स्पष्टीकरण मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलंय.

नारायण राणे हे चांगले नेते असून चांगले संघटक आहे. त्यांना काँग्रेसनं योग्य संधी दिली नाही. त्यामुळे राणेंचा काँग्रेसला फायदा होऊ शकला नाही असंही ते म्हणाले. नांदगावकर औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणे यांनी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय. पण काँग्रेस सोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण पदाचा राजीनामा दिला तर राणे काँग्रेसमध्ये थांबणार नाही अशी शक्यता आहे. राणे भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी चर्चा आहे. पण राणेंनी या वृत्ताचं खंडन केलंय आपण कुणाच्याही संपर्कात नाही असं राणेंनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे बाळासाहेबांना त्रास देणार्‍यांना शिवसेनेत प्रवेश नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं खरं पण भाजपने युतीचा धर्म पाळावा आणि राणेंना पक्षात घेऊ नये अशी मागणीही केलीय. त्यातच आता मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी राणेंवर स्तुतीसुमनं उधळलीय. पण त्यांच्या मनसे प्रवेशाचा निर्णय राज ठाकरेच घेतील असं सांगून मनसेचं दार मोकळं असल्याचे संकेत दिले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close