नारायण राणे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम

July 20, 2014 3:35 PM0 commentsViews: 5723

narayan Rane

20  जुलै : मला मुख्यमंत्रीपदच हवं किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्त्व करायला मिळावं अशी मागणीरुपी इच्छा नारायण राणे यांनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखातीत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास काँग्रेसचा पुन्हा दारुण पराभव होईल. मला वारंवार तीच तीच कारणं हायकमांडला सांगण्याची इच्छा नाही, म्हणूनच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला होतय, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

काँग्रेसचे नाराज नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा आज दुपारी कणकवलीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी राणेंवर काल केलेल्या टीकेला प्रत्यूत्तरही दिलं. चांगलं काम करणार्‍यांना अपोआप शांती लाभते. लोकांचे शोषण करणार्‍यांना शांतता लाभत नाही, असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्याचं बरोबर उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व आणि अस्तित्व काय आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या विकास कामाची यादी वाचत, सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारलं, पर्यटन जिल्हा म्हणून विकास केला, उलट शिवसेनेनं रत्नागिरी जिल्हा परिषदेला कर्जबाजारी केलं असा आरोप त्यांनी केला. तसच नुकतेच शिवसेनेत गेलेले सावंतवाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना मतदार संघाबाहेर कोणी ओळखतो का? असा सवाल करुन, हे राहतात गोव्याला आणि दहशतमुक्त सिंधुदुर्ग आणि तिकडच्या विकासाच्या गप्पा मारतात, अशी टीका त्यांनी केली. राणेंवर टीका केली की वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जागा मिळते, त्यामुळे जिल्ह्यातील लोक माझ्याविरोधात बोलत असल्याचे टोला ही त्यांनी केसरकरांना लगावला.

काँग्रेसमध्ये एकाकी पडत चाललेले पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा नाराजीने नाही तर, आनंदाने देतोय. काँग्रेस पक्षाने जे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण न केल्यामुळे राजीनाम देत असल्याचे त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. कोकणवासियांचा आशिर्वाद आपल्यावर असणार असल्याचा विश्वास दाखवत अजून राजीनामा दिलेला नाही, उद्यापासून जी काही वाटचाल करेन ती कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close