राणेंची कोकणात गुंडगिरी – दीपक केसरकर

July 20, 2014 5:02 PM0 commentsViews: 1623

kesarkar rane

20   जुलै :  गुंडगिरीची संस्कृती मोडीत काढली पाहिजे, असं शिवसेनेत प्रवेश करणारे सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांनी मुंबईत म्हटलं आहे. भरसभेत कानफटीत वाजवण्याची राणे भाषा करतात. राणेंची भाषा मुळात गुंडगिरीची आहे. माझ्या जीवाला राणेंपासून धोका आहे याची मी आधीच विधानसभा अध्यक्षांना कल्पना दिली आहे. त्यामुळे मला पोलीस संरक्षण मिळतं, असंही ते म्हणाले. त्याशिवाय, व्यक्तिगत पातळीवर राणेंनी केलेली टीका योग्य नसून त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार, त्याला राणेंनी कोर्टात उत्तर द्यावं, असं आव्हान केसरकर यांनी दिलं आहे.

दीपक केसरकर यांचं कार्य काहीच नाही, प्रसिद्धीसाठी ते माझ्यावर टीका करतात असं नारायण राणेंनी म्हटलं होतं. दहशतमुक्त सिंधुदुर्गचा नारा देणारे केसरकर जास्त वेळ तर गोव्यातच असतात असा खोचक टोलाही राणेंनी केसरकरांना लगावला होता. मोदी कृपेमुळेच त्यांचे खासदार निवडून आले, असंही राणेंनी म्हटलं होतं.

नारायण राणेंनी टीका केल्यावर दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंना प्रत्युत्तर दिले. ‘माझी मुलगी गोव्याला राहत असल्याने मी गोव्याला जातो. राणे यांनी माझ्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली असून यासाठी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करू, असं केसरकर यांनी सांगितलं. जनतेने विधानसभा निवडणुकीत राणेंना दिसू देऊ नये, असंही ते म्हणाले. तसंच चेंबूरमधल्या हर्‍या- नार्‍या गँगमधला ‘नार्‍या’ कोण ते पोलिसांनी शोधावं, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ज्या शिवसेनेनं त्यांना मुख्यमंत्री केलं त्याच शिवसेनेशी राणे कृतघ्नपणे वागले. राणेच कृतघ्न आहेत, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी राणेंवर हल्लाबोल केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close