मतदानाचा तिसरा टप्पा : देशभरात सरासरी 50 टक्के तर राज्यात 45 टक्के मतदान

April 30, 2009 4:36 AM0 commentsViews: 6

30 मार्च पंधराव्या लोकसभा निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्यात 107 जागांसाठी गुरुवारी मतदान झालं. देशातल्या 11 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांसाठी हे मतदान झालं. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. पण एकूणच या टप्प्यात मतदान कमी झालं. तिसरा टप्पात मतदान झालेल्या राज्यांमध्ये भाजपचं वर्चस्व असल्याने हा टप्पा भाजपसाठी निर्णायक होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगोडा, जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांचं भवितव्य व्होटिंग मशिन्समध्ये बंद झालं. मतदानकेंद्रांवर हिंसाचाराच्या काही तुरळक घटना घडल्या. पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांनी काही ठिकाणी हल्ले केले. पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय आदिवासी परिषदेने मतदानावर बहिष्कार टाकला. तर उत्तरप्रदेशमध्ये रायबरेली या सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात एका गावाचा मतदानावर बहिष्कार होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्चही केला. निवडणूक आयोगाने लालगड या नक्षलग्रस्त भागात मतदारांसाठी 36 बसेसची सोय केली.बसपाचे उमेदवार महम्मद अली यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. तर मुंबईतही जोगेश्वरी-लिंक रोड येथे सेना आणि बसपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या अपवादात्मक घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. संपूर्ण मुंबईत एकूण 43.52 टक्के इतकं मतदान झालं. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, जम्मू-काश्मिर आणि सिक्किम अशा 9 राज्यांमध्ये तर दादरा- नगरहवेली आणि दमण-दिव या केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश होता. देशभरातले 14 करोड मतदारांनी एकंदरीत 1 लाख 65 हजार मतदानकेंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी कर्नाटक : 57 मध्यप्रदेश : 45 पश्चिम बंगाल : 64 महाराष्ट्र : 45 उत्तर प्रदेश : 45 गुजरात : 49 बिहार : 48 सिक्कीम : 65 जम्मू आणि काश्मीर : 25 दादरा नगर हवेली : 60 दमण आणि दीव : 60

close