सानिया भारताचा अभिमान, भाजपचं घूमजाव

July 24, 2014 2:16 PM0 commentsViews: 740

sania mirza telangana

24    जुलै :  ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सानिया मिर्झा हिला तेलंगणाची ब्रँड ऍम्बॅसेडर करण्याच्या वादाला आता एक नवीन वळण लागलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच सानियाची तेलंगणाच्या ब्रँड ऍम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली होती. याला तेलंगणाचे भाजप नेते के. लक्ष्मण यांनी बुधवारी तीव्र विरोध केला आहे. सानियाचा ‘पाकिस्तानची सून’ असून तिचा तेलंगणाशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया के. लक्ष्मण यांनी दिली होती. पण या मुद्यावरून भाजपने आता घूमजाव केलं आहे. सानिया भारताचा अभिमान आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. सानियाबद्दल लक्ष्मण यांनी केलेलं वक्तव्य हे योग्य नाही आणि ते भाजपचं मत नाही, असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. सानियाला मिळालेलं यश हे तिच्या कौशल्यामुळे मिळालं आहे आणि भारताला तिचा आभिमान आहे, असंही जावडेकरांनी म्हटलं आहे.

सानिया ‘पाकिस्तानची सून’ असल्याचं म्हणत के. लक्ष्मण यांनी तिच्या निष्ठेविषयी शंका घेतली आहेत. त्याला भाजपच्या अनेक खासदारांनीही पाठिंबा दर्शवला. सानिया मिर्झा कधीही स्वतंत्र तेलंगणसाठी लढली नाही. तसंच आता ती पाकिस्तानची सून आहे. त्यामुळे तिचा तेलंगणाशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका करण्यात आली होती.

या टीकेला सानिया मिर्झानेही प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणते, ‘तेलंगणाची ब्रँन्ड ऍम्बेसेडर म्हणून माझी नियुक्ती होणं, या क्षुल्लक प्रकरणी देशातल्या राजकारण्यांचा आणि माध्यमांचा वेळ खर्च व्हावा, ही गोष्ट फारच दुदैर्वी आहे. देशासाठी महत्त्वाच्या असणार्‍या इतर विषयांवर चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी शोएब मलिकशी लग्न केलंय, जो पाकिस्तानी आहे. मात्र मी जन्मानं भारतीय आहे आणि मरेपर्यंत भारतीयच राहीन. माझ्या जन्माच्या वेळी मेडिकल इमर्जन्सी ओढवल्याने माझा जन्म मुंबईत झाला. मात्र जन्माच्या तिसर्‍या आठवड्यापासून मी हैदराबादमध्येच वाढली आहे. माझे पूर्वजही हैदराबादचेच आहेत. माझे आजोबा मोहम्मद झफर मिर्झा निजामांच्या काळात रेल्वे इंजिनिअर म्हणून कार्यरत होते तर माझे पणजोबा मोहम्मद अहमद मिर्झा जलसंपदा खात्याचे मुख्य इंजिनिअर होते. तेलंगणातल्या गंदीपेट धरण उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. माझे खापरपणजोबा अझीझ मिर्झांनी निझामाच्या काळात गृहसचिव म्हणून काम केलं. 1908 साली आलेल्या मुसी नदीच्या पुरात लोकांना वाचविण्याची कामगिरी त्यांनी बजावली. थोडक्यात आमच्या कुटुंबाची मूळं हैदराबादेत रूजलेली आहेत आणि ही माहिती सगळं काही स्पष्ट करते, असं मला वाटतं. त्यामुळे मला परकी ठरवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.’

दरम्यान, या वादावरून विरोधकांनी सानियाची पाठराखण करत भाजपला चांगलं धारेवर धरलं. ‘सानिया देशाचा गौरव असून भाजपचं सानियाबाबतीतलं वक्तव्य निंदनीय असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close