‘बाबा’ भडकले,…तर आघाडी होणार नाही राष्ट्रवादीला सुनावले

July 24, 2014 4:18 PM0 commentsViews: 4150

cm_on_ncp24 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढू अशी गर्जना राष्ट्रवादीने केली होती पण आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जशाच तसे उत्तर दिले आहे. जागावाटपाचा निर्णय होईल तो सन्मान पूर्वक झाला तरच आघाडी होईल अन्यथा आघाडी होणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं. पुण्यात काँग्रेसचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाचा निर्णय हा दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच झाला पाहिजे यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. आत्मसन्मानाने निर्णय घेतला जात असेल तरच जागावाटप होईल असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तर राष्ट्रवादीकडून 144 जागांचा आग्रह आहे जर आमच्या मागणीचा विचार होत नसेल तर चर्चा होणार नाही असं सांगण्यात आलंय असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे केला. तसंच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसची यादी जाहीर करू अशी घोषणाही माणिकरावांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 144 जागा द्यावात अन्यथा स्वबळावर 288 जागा लढवू असा इशारा दिला होता. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुतण्याचा स्वबळाच्या घोषणेतून हवा काढून घेतली होती. मी पक्षाचा अध्यक्ष असून निर्णय आम्हीच घेतो. येणार्‍या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी कायम राहिल आणि जागावाटपाचा राहिला प्रश्न तर 144 जागा मिळतील किंवा एक दोन कमी होईल असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं.

तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये ‘मुख्यमंत्री हटाव’ मोहिमेनं जोर धरला होता. यासाठी मुख्यमंत्र्यांना तिनवेळा दिल्ली दरबारी हजेरी लावावी लागली. पण अखेरीस मुख्यमंत्र्यांना हायकमांडकडून अभय मिळाला. मुख्यमंत्री राज्यात परतले आणि जोरदार कामाला लागले. हायकमांडकडून अभय मिळाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीची जागा वाटपाची मागणी बुधवारी झालेल्या बैठकीत फेटाळून लावलीय.

त्यानंतर पुण्यात झालेल्या मेळाव्यात जागावाटपाचा निर्णय होईल तो सन्मानपूर्वक झाला तरच आघाडी होईल अन्यथा आघाडी होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करुन टाकलं. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close