मी, मरेपर्यंत भारतीयच -सानिया मिर्झा

July 24, 2014 3:33 PM0 commentsViews: 1691

saniya_mirza224 जुलै : ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाची ब्रँड अँबॅसेडर करण्यावरुन वाद निर्माण झालाय पण सानियाने यावर नाराजी व्यक्त केली. मी शोएब मलिकशी लग्न केलंय, जो पाकिस्तानी आहे. मात्र मी जन्मानं भारतीय असून मरेपर्यंत भारतीयच राहीन असं भावनिक मत सानियाने व्यक्त केलं.

या प्रकरणावर सानिया म्हणते, या क्षुल्लक प्रकरणात देशातल्या राजकारण्यांचा आणि माध्यमांचा वेळ खर्च व्हावा ही बाब दुदैर्वी आहे. देशासाठी महत्त्वाच्या असणार्‍या इतर बाबींवर चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी शोएब मलिकशी लग्न केलंय, जो पाकिस्तानी आहे. मात्र मी जन्मानं भारतीय असून मरेपर्यंत भारतीयच राहीन. माझ्या जन्माच्या वेळी मेडिकल इमर्जन्सी ओढवल्यानं माझा जन्म मुंबईत झाला. मात्र जन्माच्या तिसर्‍या आठवड्यापासून मी हैदराबादमध्येच वाढलीये.

माझे पूर्वजही हैदराबादचेच आहेत. माझे आजोबा मोहम्मद झफर मिर्झा निजामांच्या काळात रेल्वे इंजिनीअर होते तर पणजोबा मोहम्मद अहमद मिर्झा जलसंपदा खात्याचे मुख्य इंजिनिअर होते अशी आठवणही सानियांने करुन दिली.

ती पुढे म्हणते, तेलंगणातल्या गंदीपेट धरण उभारण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. माझे खापरपणजोबा अझीझ मिर्झा निजामाच्या काळात गृहसचिव होते. 1908 साली आलेल्या मुसी नदीच्या पुरादरम्यान लोकांना वाचवण्याची कामगिरी त्यांनी बजावली. थोडक्यात आमच्या कुटुंबाची मूळं हैदराबादेत रूजलेली आहेत. आणि ही माहिती सगळं काही स्पष्ट करते, असं मला वाटतं. त्यामुळे मला परकी ठरवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते असंही सानिया म्हणाली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close