लष्करप्रमुखांना बडतर्फ करण्याचा पंतप्रधान प्रचंड यांचा निर्णय : नेपाळमध्ये ‘ प्रचंड ‘ संकट

May 4, 2009 5:41 AM0 commentsViews: 5

4 मे , नेपाळ नेपाळच्या माओवादी पक्षाचे पंतप्रधान प्रचंड यांनी लष्करप्रमुख जनरल रुकमंगद कटवाल यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. पण राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी पंतप्रधान प्रचंड यांच्या निर्णयावर काही शिक्कामोर्तब केलेलं नाही. पंतप्रधानांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष राजकीय पक्ष आणि घटना तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे. सत्ताधारी आघाडीचे चार घटक पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसनं पंतप्रधनांच्या निर्णयाला विरोध केला आहे. माओवाद्यानंतर आघाडीतल्या सीपीएन-युएमएल या दुसर्‍या मोठ्या पक्षानं या मुद्द्यावरून सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. लष्करप्रमुखांना बडतर्फ करण्याच्या मुद्द्यावरून नेपाळी काँग्रेस आणि माओवादी एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. नेपाळच्या लष्करात माओवाद्यांची भरती करण्यास लष्करप्रमुख जनरल रुकमंगद कटवाल यांनी नकार दिला होता. त्यावरून कटवाल आणि नेपाळ सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल रुकमंगद कटवाल यांच्यावर ठेवून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कटवाल यांच्याजागी लेफ्टनंट जनरल कुलबहादूर यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. नेपाळ सरकारच्या या निर्णयाला नेपाळी काँग्रेस आणि सत्ताधारी आघाडीचे चार घटक पक्षांचा कडाडून विरोध आहे.

close