युतीची बैठक संपली, भाजपला हव्यात वाढीव 15 जागा !

July 25, 2014 3:49 PM0 commentsViews: 3902

bjp_sena_meeting25 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी अखेर भाजप-शिवसेनेच्या बैठकीला मुहूर्त सापडला. आज (शुक्रवारी) मुंबईत युतीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने 15 वाढीव जागेची मागणी केली आहे. तासगाव, गुहागर, कोथरुड, मुंबादेवी, विलेपार्ले, भिवंडी, पालघर किंवा डहाणू, तिवसा किंवा अचलपूर आणि धुळे शहरसाठी भाजपचा आग्रह आहे.

तर जागांची अदलाबदल करायची असेल तर त्या तोडीचा मतदारसंघ हवा, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. या बैठकीला भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे- पालवे तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, लीलाधर डाके, गजानन किर्तीकर उपस्थित होते.

विशेष म्हणजे या काही दिवसांपूर्वी भाजपने स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली होती. शिवसेनेशी युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपच्या नेत्यांनी धरला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युती अभेद्य राहील असं स्पष्ट केलं होतं. या वादानंतर अखेर युतीची ही बैठक पार पडली आता नेमकी किती आणि कुणाच्या वाट्याला किती जागा मिळणार हे पाहण्याचं ठरेल.

‘भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही’

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू इच्छित नाही, अशी माहिती आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर केले. या प्रयत्नाला घवघवीत यश देखिल मिळालं होतं.

पण महाराष्ट्रात नेतृत्वावरुन सुरू असलेल्या वादावरुन निवडणुकीत त्याचा फटका बसेल अशी भीती भाजपला वाटतेय. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली मुख्यमंत्रीपदाची चुरस तीव्र झालीये. त्यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नावही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आलंय. कुणा एकाचं नाव जाहीर केल्यानं त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती आता भाजपला वाटतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close