काँग्रेसच्या मदतीमुळेच सुप्रिया सुळे खासदार-ठाकरे

July 26, 2014 8:22 PM0 commentsViews: 2140

manirao_thakare_on_sule26 जुलै : आघाडीतल्या जागावाटपाचा वाद तापलेला असतानाच आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. बारामतीतून सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून आल्यात पण काँग्रेसनं मदत केली नसती तर बारामतीचा निकाल वेगळा लागला असता, अशा शब्दांत माणिकरावांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली.

बारामतीमध्ये दोन मतदारसंघात काँग्रेसने भरभरुन मतदान केलं आणि चार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला जास्त मतं मिळाली पण तीन मतदारसंघामध्ये कमी मतं मिळाली जर काँग्रेसने मदत केली नसती तर आज बारामतीत परिस्थिती वेगळी असती असा टोलाही माणिकरावांनी लगावला.

तसंच काँग्रेसच्या मतदारसंघात राष्ट्रवादीनं काम केलं नाही असा आरोपही माणिकरावांनी केला. औरंगाबादमध्ये काँग्रेसचा विभागीय मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार म्हणून निवडून आल्यात पण त्यांचा विजय हा अपेक्षेप्रमाणे झाला नाही. अवघ्या 70 हजार मतांनी त्यांचा विजय झाला. मागील निवडणुकीत सुळेंचा 3 लाख मतांधिक्यानी विजय झाला होता. याच जखमेवर माणिकरावांनी मिठ चोळून राष्ट्रवादीला जागावाटपाबाबत सुचक इशारा दिलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close