आज बेळगाव बंदची हाक

July 28, 2014 11:13 AM0 commentsViews: 965

Belgaon band

28  जुलै :   येळ्ळूरमध्ये मराठी फलक काढून टाकण्याच्या प्रकारानंतर आज बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बंद पुकारला आहे. निपाणीमधील बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. निपाणीमधील सगळे व्यवहार, बाजारपेठा बंद आहेत. तर पोलीस सहआयुक्त हेमंत निंबाळकर यांनी येळ्ळूरला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली आहे.

बेळगावमध्ये पुन्हा उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक पोलिसांनी रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकड सुरू केली. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिक लोकांवर अमानुष लाठीमार केला. लोकांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी आपले पैसे आणि मोबाईलही नेल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 50 जणांवर लाठीमार केल्याची माहिती आहे. त्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. तर बेळगावमधल्या कडोळी, करंग्राली, बाची या तीन गावातले फलक पुन्हा लावण्यात आलेत. येळ्ळूरमधलं सध्याचं वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून मराठी नागरिकांना झालेल्या मारहाणीबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दोन्ही राज्यांनी सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय पाळणे मान्य केले असताना कर्नाटक सरकारची ही कारवाई बरोबर नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close