धनगर आरक्षण समितीचे कार्यकर्ते आज सोडणार उपोषण

July 29, 2014 11:15 AM0 commentsViews: 1646

dhangar_ST_aarakshan29   जुलै : आदिवासी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचे गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहे. हे उपोषणकर्ते अखेर  आज उपोषण सोडणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) उपोषण सोडण्यात येईल, असं आंदोलकांनी स्पष्ट केलंय.

पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची सोमवारीच उपोषण सोडण्याची केलेली विनंती आंदोलकांनी धुडकावली होती. धनगर समाजाच्या मागणीला आदिवासी समाजानं तीव्र विरोध केलाय. याच वादावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदिवासी नेत्यांची बैठक बोलावली आहे.

आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पद्माकर वळवी, राजेंद्र गावित यांना चर्चेसाठी बोलावण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम आणि हर्षवर्धन पाटीलही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी रात्री या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

दुसरीकडे धनगर समाजाच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. आता हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्याच कराडमध्ये छेडण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब गावडे यांनी दिला आहे. पण आरक्षणाचा लढा राजकीय नसून सामाजिक असल्याने सर्व पक्षांचा पाठिंबा घेणार असल्याचं धनगर नेत्यांनी स्पष्ट केलंय.

आंदोलनं सुरूच

धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभरातही आंदोलनं होत आहेत. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, बीड, सोलापुरात मोर्चे निघालेत. औरंगाबादमध्येआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा औरंगाबादेत काढण्यात आला.

महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. मराठवाड्यात आज परळी,माजलगाव आणि पैठण इथंही मोर्चे निघाले. बारामतीत फलटण रोडवर आंदोलकांनी रास्तारोको करत टायर्सची जाळपोळ केली. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि कर्जत मध्ये आंदोलन सुरू आहे.

त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी होते. धनगरांच्या आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्यांना राज्यात फिरु देणार नाही, असा घरचा अहेर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी दिलाय.

सोलापुरात मोर्चा

तर सोलापुरातही धनगर समाजाच्या लोकांनी मोर्चा काढला. यावेळी एसटी आरक्षणाला विरोध करणार्‍या मधुकर पिचड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. हा मोर्चा सोलापूर शहरातल्या शिवाजी चौकापासून ते पार्क चौकापर्यंत काढण्यात आला.

अजित पवारांची गाडी अडवली

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी महासंघानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा नंदुरबारमध्ये अडवला. जिल्हा आढावा बैठकीसाठी अजित पवार नंदुरबारमध्ये आहेत. यावेळी आदिवासी महासंघाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी नवापूर चौकात ठिय्या आंदोलन केलं आणि अजित पवारांची गाडी रोखली. साधारण अर्धातास हे आंदोलन सुरू होतं. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजुला केल्यावर उपमुख्यमंत्री पुढे जाऊ शकले.

राष्ट्रपतींची भेट

दरम्यान, धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याला विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या आदिवासी नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारयणन यांची भेट घेतली. हे आरक्षण घटनाविरोधी असल्याचं वसंत पुरके यांनी म्हटलंय.

 आयबीएन लोकमतचे सवाल

- धनगर हे आदिवासी नाहीत, या पिचड, पुरके यांच्या दाव्यात तथ्य आहे का?
- आर आणि डी या इंग्रजी अक्षरांमुळे धनगर आणि धनगर हा वाद निर्माण झाला आहे का?
- हा प्रश्नी मार्गी लावण्यासाठी सरकार मानववंश शास्त्रज्ञांची मदत घेणार का?
- राजकीय लाभ उचलण्यासाठी राजकीय नेते आणि पक्ष आरक्षणाचा वाद झुलवत ठेवताहेत का?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close