राणेंच्या नाराजीसाठी मी जबाबदार नाही -मुख्यमंत्री

July 29, 2014 10:32 AM0 commentsViews: 1574

CM exclusive

29  जुलै :  नऊ वर्षांपूर्वी नारायणराणे आणि हायकमांडमध्ये काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. राणेंचा प्रश्न माझ्या पातळीवरचा नसून त्यांच्या नाराजीसाठी मी जबाबदार नाही तसंच राणेंनी केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल वाईट वाटले, आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज नारायण राणेंनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी राणे आणि हायकमांडमध्ये काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. त्यामुळे या प्रश्नावर हायकमांडच तोडगा काढू शकेल. अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. राणेंच्या वादावर तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बेळगावातील मराठी भाषिकांवरील अमानुष लाठीमाराचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी निषेध केला. मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करणार्‍या कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सीमावादावर कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश घोषित करावा. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित असून यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दिल्लीत पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close