औरंगाबाद आणि परभणीमध्ये डेंग्यूच्या तापाची साथ?

July 29, 2014 2:06 PM0 commentsViews: 144

dengue mosquito

29   जुलै : औरंगाबादेत साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला आहे. शहरात अनेकांना तापाची लागण झाली आहे. शहराजवळच्या वाळूज एमआयडीसी परिसरात संशयित डेंग्यूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांची वसाहत असलेल्या बजाज नगरमध्ये विठ्ठल मगरे या तरुणाचा आणि आश्लेषा शहाणे या चिमुकलीचा बळी गेला आहे. बजाज नगरातील जवळपास 50 ते 60 रुग्ण तापाच्या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. बजाज नगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा आणि घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. साथीची लागण झपाट्याने होत असताना जिल्हा प्रशासन काहीच करत नसल्याचाही आरोप नागरिक करतायेत. प्रशासन मात्र कारवाई करत असल्याची बतावणी करत आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या खळी गावात गेल्या 15 दिवसांपासून तापाची साथ आली आहे. अनेक गावकरी तापाने हैराण झाले आहेत तर 4 मुलांना डेंग्यूची लागण झाली आहे. ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दैना उडाली आहे. खळी गावात मूलभूत सुविधांचीच वानवा आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावातील नाल्यांमधील पाणी गावात ठिकठिकाणी साचल्यामुळेच अनेक जणांना तापाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जातायत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close