इराकच्या युद्धकुंडातून लातूरचे 4 तरुण सुखरूप मायदेशी परतले

July 29, 2014 6:18 PM0 commentsViews: 1119

iraq crisis_latur_4 pepole29 जुलै : इराकच्या युद्धकुंडात अडकलेल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील 4 युवक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहे. या तरुणांचा संपर्क कांही दिवसांपासून तुटला होता. हे तरूण केरळच्या नर्सेस बरोबर येतील अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांना होती. पण महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर हे चारही तरुण सुखरूप आपल्या गावी परतले आहे. इराकमधून परतल्या नंतर लातूर गाठलेल्या या युवकांनी इराकमध्ये सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचा पाढाच वाचला.

निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा येथील ज्ञाणेश्वर भोसले, नितीन कांबळे तर शिरढोण येथील प्रमोद सोनवणे असे चार युवक भाकरीच्या
शोधात इराकपर्यंत पोहचले होते. मात्र अचानक इराकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने या युवकांच्या कुटुंबीयांना आपल्या मुलांची काळजी लागली होती. आता मात्र हे युवक सुखरूप भारतात परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास घेतला.

मुंबई येथील एका एजंटच्या मार्फत हे तरुण कामासाठी इराकमध्ये पोहचले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत या मुलांना इराक मधल्या बसरा शहरात इराकी मालकांनी एका गोडावूनमध्ये अक्षरश: डांबून ठेवले होते. जेवण आणि पाण्याबरोबरच जगण्याचे हाल सुरू होते. जेवणाचा आग्रह केला तर बंदूक उगारली जायची अशी परिस्थिती असल्याचे हे तरुण सांगतात.

एवढंच नाहीतर आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्याठिकाणी कधीही गोळीबार सुरू होत होता, आमच्या निवासस्थानापासून दोन किलोमीटर अंतरावर बॉम्बस्फोटही झाला असा थरारक अनुभव या तरुणांनी सांगितला. तसंच आम्हाला आमच्या देशात परत जायचंय अशी विनंती आम्ही आमच्या मालकांला केली होती पण परिस्थिती पाहता त्यांनी आम्हाला तेथून जाऊ दिलं नाही.

आम्ही भारतीय दूतावासालाही कळवलं पण काही फायदा झाली. अखेर इंटरनेटवरुन सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर यांचा फोन नंबर शोधला आणि त्यांना फोन करुन आमची अवस्था सांगितली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी बातमी लावून धरल्यानंतर भारतीय दुतावासाने आमची दखल घेतली.  मायदेशी परतलो याचा खूप आनंद आहे पण आता परत इराकला जाणार नाही असंही या तरुणांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close