नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ

May 5, 2009 4:30 AM0 commentsViews: 9

5 मे, काठमांडूनेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी राजीनामा दिल्यामुळे आता नेपाळचे पंतप्रधान कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून के. पी. ओली, माधव नेपाल, झलानाथ खनाल यांची नावं समोर येत आहेत. लष्करप्रमुख जनरल रुकमंग कटवाल यांच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी धुडावल्यामुळे प्रचंड यांनी राजीनामा दिला. प्रचंड यांच्या राजीनाम्यामुळे नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नेपाळचे लष्करप्रमुख जनरल रुकमंग कटवाल यांच्या बडतर्फीचं राजकारणामुळे काठमांडूच्या रस्त्यावर पुन्हा एकदा राजकीय वणवा भडकला. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांच्या माओवादी कॅडरला लष्करात सहभागी करून घ्यायच्या आदेशाला कटवाल यांनी साफ नकार दिला होता. माओवादी केडर जर लष्करात आलं तर लष्कारातल्या अराजकीय स्वरूपाला तडा जाईल असंही जनरल कटवाल यांनी माओवाद्यांना सुनावल होतं. जनरल कटवाल यांनी तीन हजार नव्या जवानांची लष्करात भरती केली. तसंच मावोवाद्यांचा विरोध डावलून जनरल कटवाल यांनी 8 ब्रिगेडीयर-जनरल्सची पुन्हा नियुक्ती केली. त्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड यांनी जनरल कटवाल यांना पदावर बडतर्फ केलं. पण राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनीच या निर्णयाला विरोध केला. त्याशिवाय प्रचंड यांच्या सरकारमधल्या चार घटक पक्षांनी आणि विरोधी पक्षांनीही याविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे माओवादी रस्त्यावर उतरले. सत्तेवर आल्यापासून माओवादी हे नेपाळचे लष्करप्रमुख जनरल कटवाल यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहेत अशी माहिती नेपाळचे माहिती मंत्री क्रिष्ण बहादूर माहरा यांनी दिली आहे. पण यात किती तथ्य आहे ते प्रचंड, त्यांचे माओवादी आणि जनरल कटवाल यांनाच माहीत… पण प्रचंड यांच्या निर्णयाला सरकारमधल्या एकाही पक्षानं पाठिंबा दिला नाही. माओवाद्यांचं संसदेत पुरेसं बहुमत नाही. म्हणून प्रचंड यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नेपाळमधलं पहिलंवहिलं निवडून आलेलं माओवाद्यांचं सरकार अवघ्या नऊ महिन्यातच कोसळलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी लष्कर प्रमुख जनरल कटवाल यांची त्यांच्या पदावर पुन्हा नेमणूक केली. आणि आता तर नेपाळमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय समीकरणं तयार होऊ लागली आहेत. सर्वसहमतीचं नवं सरकार बनवण्यासाठी नेपाळच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रचंड यांच्या सरकारमधला एक मोठा पक्ष CPN -UML नव्या आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. नेपाळ काँग्रेसचे नेते शेखर कोईराला यांनी CPN -UML ला पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.

close