गडकरींच्या घरी हेरगिरीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही -गृहमंत्री

July 30, 2014 4:01 PM0 commentsViews: 273

rajnath singh30 जुलै : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजपचे बडे नेते नितीन गडकरींच्या घरी हेरगिरी झाल्याच्या संशय असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्यावरून आज (बुधवारी) संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये गदारोळ झाला.

सरकारने अशी कोणतीही हेरगिरी झाली नाही, असं स्पष्ट केलंय. विरोधक तथ्य नसलेल्या मुद्द्यावरून घोळ घालत आहेत, असं सत्ताधार्‍यांचं म्हणणं आहे. पण काँग्रेसने मात्र या प्रकरणी तपासाची मागणी केलीय.

आपल्या घरात हेरगिरी होत असल्याच्या वृत्ताचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इन्कार केला. या बातम्या म्हणजे कयास
असल्याचं ट्विट याआधी त्यांनी केलं होतं. पण, आता ते या वृत्ताचं स्पष्ट शब्दात खंडन करत आहेत. याच मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला. विरोधकांच्या दबावानंतर अखेर गृहमंत्र्यांना निवेदन सादर करावं लागलं.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून हेरगिरी होत असलेल्या सहा राजकीय पक्षांपैकी भाजप एक असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. त्यानतंर गडकरींच्या घरातून ही हेरगिरीची बातमी आली. यावर काँग्रेसनं जोरदार आवाज उठवलाय. 2010 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या ऑफिसमध्येही अशाच प्रकारे हेरगिरी झाल्याचं मुखर्जी यांनी पंतप्रधानांना कळवलं होतं.

काँग्रेससोबतच जेडीयू आणि समाजवादी पक्षानंही हा मुद्दा लावून धरलाय. त्यामुळे सरकार यावर चर्चा करायला तयार होते की, हेरगिरीची बाब आधारहीन असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहते, हे बघावं लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close