…5 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं !

July 30, 2014 8:57 PM0 commentsViews: 5526

malin_update_news30 जुलै : ‘आज सकाळी साडे-सातच्या सुमाराला डोंगराचा भाग अचानक खाली सरकला आणि 5 मिनिटं न लागता अख्ख गावं ढिगाराखाली गाडलं गेलं, जवळपास 50 घरं यात दबली गेली आमची माणसं गेली, जनावरं गेली आता दुख तर आहेच पण आम्ही काय करावं बोलण्यातही अर्थ नाही’ अशी दुख:द प्रतिक्रिया माळीण गावचे माजी पोलीस पाटील रामचंद्र यांनी दिली. माळीण गावात सर्वत्र स्मशान शांतता पसरलीय. या अपघातातून वाचलेले गावकरी अस्मानी संकटापुढे हतबल झाले असून दुखामुळे खच्चून गेले आहे. सकाळी साडे सातच्या सुमारास घटना घडली पण प्रशासनाची मदत साडेदहाच्या नंतर मिळाली, ज्या ठिकाणी जास्त घरं होती त्याठिकाणी तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा आता गावकरी करत आहे. या दुर्घटनेत 40 घरं ढिगाराखाली गाडली गेली असून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय.

10 फूट खोल ढिगार

माळीण गावात घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम दाखल झालीय पण पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे जमिनी निसरडी आणि चिखलमय झालीय. त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी गेलेली वाहनंही चिखलात रुतलीय. काही जेसीबी वाहन घटनास्थळी पोहचली असून मदतकार्य सुरू आहे. डोंगराचा ढिगार हा 10 फूट खोल असून त्याखाली घरं दबली आहे. त्यामुळे मदतकार्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागू शकतो. मात्र ढिगाराखाली कुणी वाचलं असेल याची शक्यता मात्र कमी आहे. ज्यांना वाचवणं शक्य आहे त्यांना वाचवलं जाईल अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली.

…आणि अंत्यसंस्काराची तयारी

या दुर्घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय पण 200 जणांचा मृत्यू झाला अशी भीती व्यक्त होत आहे. माळीण गावाच्या आसपासच्या गावातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतलीय. जो तो आपल्या परीने मदत करत आहे. मात्र या दुर्घटनेत मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झालाय. घटनेचा अंदाज घेता 200 जणांवर अंत्यसंस्कार होईल असं गृहीत धरलं जात आहे. या दुखाच्या प्रसंगात भीमाशंकर साखर कारखान्याच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे.

घटनास्थळी भेट

माळीण गावात झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आणि गावकर्‍यांचं सांत्वन करण्यासाठी सर्व नेत्यांनी धाव घेतलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुख व्यक्त केलं असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. उद्या राजनाथ सिंह घटनास्थळी भेट देणार आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या घटनास्थळी रवाना होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close