पालघरचा मार्ग मोकळा, 1 ऑगस्टला नव्या जिल्ह्याचा जन्म !

July 30, 2014 9:52 PM0 commentsViews: 2022

new_palgharनीरज राऊत, पालघर

30 जुलै : पालघरला मुख्यालय करू नये या मागणीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा 1 ऑगस्टला निर्माण होतोय. त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती. आता येत्या 1 ऑगस्टला ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.

राज्यातला 36 वा जिल्हा म्हणून पालघर आता ओळखला जाईल. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारनं 13 जून रोजीच घेतला होता.

पालघर….राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेला जिल्हा…डोंगरी, सागरी आणि नागरी अशा तीन भौगोलिक प्रदेशाने नटलेला जिल्हा…
पालघर जिल्ह्यात आठ तालुके असतील, त्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई. जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 5,344 चौरस किलोमीटर, तर लोकसंख्या आहे तीस लाखांच्या जवळपास. या नव्या जिल्ह्याला एक खासदार आणि सहा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत. देशातील पहिलं अणुऊर्जा केंद्र हे याच जिल्ह्यातल्या तारापूर इथं आहे. इथून 1400 मेगावॅटची वीज निर्मिती होते. याशिवाय डहाणूत रिलायन्स एनर्जीचं औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. बोईसर, पालघर, वाडा आणि तलासरी इथं उद्योगधंदेही येऊ लागले आहेत. आता यापुढे औद्योगिक विकासासोबतच कृषीविकासाला चालना मिळेल असं म्हटलं जातंय.

जिल्ह्याला 85 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय. तसंच जिल्ह्याच्या डोंगरी भागात पिण्याचं पाणी, कुपोषण, शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या आहेत. पण आता पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा विकास होईल, असं शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांना वाटतंय.

नव्या जिल्ह्याच्या स्थापनेनंतर या आदिवासी बहुल भागाचा सर्वांगिण विकास होईल, अशी आशा नियोजित जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलीय.पालघर निर्मितीवरुन जव्हार भागातली काही मंडळी नाराज आहेत, पण त्यांची नाराजी दूर करुन सरकार या भागातल्या विकासकामांना कशी गती देणार याचं आव्हान मात्र इथल्या नव्या प्रशासनासमोर असणार आहे.

 नवा जिल्हा – पालघर

 • - 1989 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांकडून विभाजनाचे सुतोवाच
 • - जिल्ह्याचं मुख्यालयावरुन वाद रंगल्यानं विभाजन रेंगाळलं
 • - विभाजनाऐवजी त्रिभाजनाची मागणी पुढे आली
 • - 1994 साली गो.बा. पिंगुळकर समिती, 2012 साली विजय नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
 • - पिंगुळकर आणि नाहटा समितीनं जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी पालघरची शिफारस केली
 • - जिल्ह्यात वसई-विरार ही महानगरपालिका
 • - डहाणू, पालघर, जव्हार या नगरपालिका

 प्रमुख समस्या

 • - पिण्याचं पाणी
 • - कुपोषण
 • - शिक्षण
 • - रोजगार
 • - मूलभूत सुविधांचा अभाव
 • - घनकचरा व्यवस्थापनाची समस्या
 • - किनारपट्टीची होणारी धूप
 • - नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे कमी होणारे शेती-बागायती क्षेत्र

 याचा विकास अपेक्षित

 • - पर्यटन व्यवसाय
 • - पारंपरिक भातशेती
 • - भाजीपाला लागवड
 • - फुलशेती
 • - फळबाग लागवड

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close