माळीण दुर्घटनेत मृतांची संख्या 30 वर, 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2014 1:29 PM0 commentsViews: 4410

Bty5WEJCUAALZNu

31  जुलै :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काल संकट कोसळलं. जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र सतत कोसळणार्‍या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आज सकाळपासून मुसळधार पावसामुळे बचावकार्य काहीवेळासाठी थांबवण्यात आले होते. आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बचावकार्यसाठी एनडीआरएफ (NDRF)च्या 7 टीम तैनात केल्या आहेत. माळीण गावात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून बचावकार्यात अडथळे येताहेत. त्यामुळे बचावकार्याला 3 ते 4 दिवस लागू शकतात. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माळीण गावाला भेट दिली. तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. माळीण गावातल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. आता दिल्लीला जाऊन ते याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार माळीण गावासाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात माळीण गावाला भेट देणार आहे.

राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण

माळीण गावातल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाला आता जाग आली आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 कंपन्यांची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी 428 पदे असतील. ती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमार्फत भरण्यात येतील. महाराष्ट्रात सातत्याने पूर, भूकंप, चक्रीवादळ तसेच पाणीटंचाई अशा नैसर्गिक आपत्ती येतात, त्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात येईल. सध्या कोणतीही आपत्ती ओढवल्यास पुण्यात असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेतली जाते.

राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक

पुण्यातल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आहे. दुर्घटनेच्या कारणमीमांसेबरोबरच उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. यामध्ये मदतीविषयी निर्णयांची शक्यता आहे. सर्व मंत्र्यांना इतर दौरे रद्द करून बैठकीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close