नेपाळमध्ये राजकीय पेच कायम

May 6, 2009 4:30 AM0 commentsViews: 3

6 मे, काठमांडू नेपाळमध्ये अजूनही राजकीय पेच कायम आहे. नवं सरकार स्थापनकरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी राजकीय पक्षांना शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, नेपाळमधल्या सुप्रिम कोर्टानं राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांच्या ऑफिसला नोटीस बजावली आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी असूनही लष्करप्रमुख जनरल रुकमांग्द कटवाल यांच्या बडतर्फीला राष्ट्राध्यक्षांनी का मान्यता दिली नाही, अशी विचारणा कोर्टानं केली आहे. जनरल रुकमांग्द कटवाल यांची बडतर्फी रद्द करणे, पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा आणि नवं सरकार स्थापन करणं या मुद्द्यांवरून राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव आणि माओवादी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. नेपाळचे माओवादी पक्षाचे पंतप्रधान प्रचंड यांनी राजीनामा दिल्यानं माओवाद्यांचं सरकार अवघ्या नऊ महिन्यांतच कोसळलं. आता नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली राजकीय पक्षांनी सुरू केल्या आहेत. नेपाळ – युएमएल या पक्षानं यासाठी एक बैठक बोलावली होती. पण माओवाद्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी लष्करप्रमुख जनरल रुकमंग कटवाल यांना बडतर्फ केल्याशिवाय नव्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही, असा निर्णय माओवाद्यांनी घेतलाय. पण, मादेशी पक्षाचा नव्या सरकारला पाठिंबा मिळेल, अशी युएमएल आणि नेपाळी काँग्रेसला आशा वाटतेय. दरम्यान, माओवादी केडर काठमांडूच्या रस्त्यावर उतरलेत. राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांची कृती घटनाबाह्य असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन सुरू केलंय. राष्ट्राध्यक्षांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय. या घटनेचा फायदा उठवत माओवादी पुन्हा शस्त्रं हाती घेतात की काय अशी भीती निर्माण झालीय.

close