मुंबईत पावसाचे धूमशान, वाहतूक मंदावली

July 31, 2014 10:40 PM0 commentsViews: 1563

mumbai rain news31 जुलै : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता आपला मुक्काम चांगलाच वाढवलाय. बुधवारी रात्रीपासून पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. आज दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. यामुळे मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वे 20 ते 30 मिनिटाने उशिराने धावत आहे.

तर रस्त्यांवर ठिकाण-ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईत मानखुर्द स्टेशन, चेंबूर कॅम्प परिसरात पाणी साचलं आहे. कुर्ला स्टेशन परिसरातही पाणी साचलंय.

दोनच दिवसांपूर्वी हवामान खात्याने मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. बंगालाच्या महासागरात हवेचा दबावपट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार असा इशारा देण्यात आला होता. आता मात्र येत्या 48 तासांत आणखी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईत 2008 साली घडलेल्या 26 जुलैची धाकधूक मुंबईकरांना लागली आहे.

डहाणूमध्ये धो-धो

लागोपाठ सहा दिवस डहाणू परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मिरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर-बोईसर इथेही जोरदार पाऊस पडतोय. डहाणू जवळच्या कासा गावातील सुर्या नदीवरील पुलावरून सध्या पाणी जात आहे. कासा पूल पाण्याखाली गेल्याने डहाणू, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिकला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुर्या नदीने रौद्ररुप धारण केलं आहे.

त्यामुळेशेजारच्या 46 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कासामधल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणारा धामणी धरण 85 टक्के भरलं आहे. धामणीचे दरवाजे आज दोन फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. डहाणुतल्या बाबोव गावात शेतात वीजेची तार पडून कमलेश पिलोना या 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

चेंबूरमध्ये दरड कोसळून 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका इथं दरड कोसळून एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडलीय. झोपडीवर दगड पडण्याचा आवाज आल्यानंतर घरातले सर्वजण बाहेर पडले. पण सहा वर्षांचा गणेश कुर्‍हाडे झोपडीतच अडकला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेशला शताब्दी हॉस्पिटलमध्ये भरती केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वाशी नाका येथे डोंगरावर सह्याद्रीनगर इथं ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक मदतकार्यासाठी पोहोचलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close