पालघर नवा जिल्हा

August 1, 2014 10:15 AM0 commentsViews: 1045

PalGhar

01 ऑगस्ट : पालघर! राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेला जिल्हा. डोंगरी, सागरी आणि नागरी अशा तीन भौगोलिक प्रदेशाने नटलेला जिल्हा..!

राज्याचा 36 वा जिल्हा म्हणून पालघरची आजपासून निर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांनी पालघर जिल्ह्याचे दस्तऐवज पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे सुपूर्द केलेत. या सोहळ्याकडे राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक या कार्यक्रमाला हजर होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी कार्यक्रमाला गैरहजर राहून नाराजी नोंदवली आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती ही केवळ काँग्रेसच्या मंत्र्यांसाठी करण्यात आल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. याच कार्यक्रमात जिल्ह्याचं मुख्यालय जव्हारला व्हावं यासाठी जव्हार समर्थकांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली.

सध्याच्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1.10 कोटी आहे. मात्र, विभाजनानंतर अस्तित्वात येणार्‍या नव्या पालघरची एकूण लोकसंख्या 14,35,178 एवढी असून, ठाण्याची लोकसंख्या 96 लाख 18 हजार 953 इतकी राहणार आहे तर ठाणे शहराची लोकसंख्या 18 लाखांवर आहे. पालघर जिल्ह्यात आठ तालुके असतील, त्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई.

जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 5,344 चौरस किलोमीटर तर लोकसंख्या आहे 30 लाखांच्या जवळपास. या नव्या जिल्ह्याला एक खासदार आणि सहा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत. देशातील पहिलं अणुऊर्जा केंद्र हे याच जिल्ह्यातल्या तारापूर इथे आहे. इथून 1400 मेगावॅटची वीजनिर्मिती होते. याशिवाय डहाणूत रिलायन्स एनर्जीचं औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. बोईसर, पालघर, वाडा आणि तलासरी इथं उद्योगधंदेही येऊ लागले आहेत. आता यापुढे औद्योगिक विकासासोबतच कृषी विकासाला चालना मिळेल असं म्हटलं जात आहे.

पालघर जिल्ह्याला 85 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. तसंच जिल्ह्याच्या डोंगरी भागात पिण्याचं पाणी, कुपोषण, शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या आहेत. पण आता पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा विकास होईल, असं शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍यांना वाटत आहे.

गडचिरोली, नंदुरबारप्रमाणे पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व मिळणार असल्याने त्यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या कोट्यवधींच्या अनुदानामुळे पालघर परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे. नव्या जिल्ह्याच्या स्थापनेनंतर या आदिवासी बहुल भागाचा सर्वांगिण विकास होईल, अशी आशा नियोजित जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्हा निर्मितीवरून जव्हार भागातली काही मंडळी नाराज आहेत, पण त्यांची नाराजी दूर करून सरकार या भागातल्या विकासकामांना कशी गती देणार याचं आव्हान मात्र इथल्या नव्या प्रशासनासमोर असणार आहे.

 नवा जिल्हा – पालघर

 • 1989 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांकडून विभाजनाचे सूतोवाच
 • जिल्ह्याच्या मुख्यालयावरून वाद रंगल्यानं विभाजन रेंगाळलं
 • विभाजनाऐवजी त्रिभाजनाची मागणी पुढे आली
 • 1994 साली गो.बा. पिंगुळकर समिती, 2012 साली विजय नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
 • पिंगुळकर आणि नाहटा समितीनं जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी पालघरची शिफारस केली
 • जिल्ह्यात वसई-विरार ही महानगरपालिका
 • डहाणू, पालघर, जव्हार या नगरपालिका

प्रमुख समस्या

 • पिण्याचं पाणी
 • कुपोषण
 • शिक्षण
 • रोजगार
 • मूलभूत सुविधांचा अभाव
 • घनकचरा व्यवस्थापनाची समस्या
 • किनारपट्टीची होणारी धूप
 • नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे कमी होणारे शेती-बागायती क्षेत्र

याचा विकास अपेक्षित

 • पर्यटन व्यवसाय
 • पारंपरिक भातशेती
 • भाजीपाला लागवड
 • फुलशेती
 • फळबाग लागवड

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close