धनगर समाजाचा मुंबईत भव्य मोर्चा

August 1, 2014 2:22 PM0 commentsViews: 2062

dhanger samaj

01 ऑगस्ट :  धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी आज मुंबईत भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे आझाद मैदानात जाऊन त्याचं सभेत रुपांतर होणार आहे. या आंदोलनात शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रवादीचे आमदार रमेश शेंडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, हनुमंत सूळ आणि बाळासाहेब गावडे सहभागी झाले आहेत.

याआधी धनगर समाजानं बारामतीमध्ये आठवडाभर उपोषण केलं होतं. दरम्यान धनगर आरक्षणाच्या विरोधात राज्यातले आदिवासी नेते एकत्र आले. त्यांच्या नेतृत्त्वात आदिवासीही रस्त्यावर उतरले. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा वेगळा वाद पेटला आहे.

दरम्यान, उस्मानाबादमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी बारामतीमध्ये उपोषणस्थळी भेट दिली नव्हती, त्यामुळे धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गोंधळ झाला. तर धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर धनगर समाजानं आंदोलन केलं. आंदोलकांनी मेंढ्यांसह महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close