मुंबईत डोंगरपायथ्याशी 263 ‘माळीण गावं’!

August 1, 2014 4:51 PM0 commentsViews: 1366

mumbai_landslideप्रफुल्ल साळुंखे, मुंबई

01 ऑगस्ट : पुण्याजवळ माळीण गावामध्ये दरड कोसळून दुर्घटना घडलीय. पण मुंबईतही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. मुंबईत अशा दरडींच्या पायथ्याशी राहणार्‍यांची संख्याही लाखांच्या घरात आहे. मुंबईत 263 ठिकाणं धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

सर्वच डोंगर झोपडयांनी झाकोळले आहेत. रस्त्यांसाठी अनधिकृतपणे डोंगर पोखरले जात आहेत. डोंगर पोखरल्यानं झाडं उन्मळून पडण्याचा धोका आहे. काही टेकड्यांवर पावसाचं पाणी वाहून जाण्याची सोय देखील नाही. साचून राहणार्‍या पावसामुळे डोंगर खचण्याचा धोका
वाढलाय. शहरात दरड कोसळण्याच्या काही घटना यासाठी पुरावा आहे.

मुंबईतल्या दरड कोसळण्याच्या घटना

13 जुलै 2000 घाटकोपर 67 ठार
4 सप्टेंबर 2009 साकीनाका 12 ठार
3 सप्टेंबर 2012 चेंबूर जीवितहानी नाही
11 जुलै 2013 ऍन्टॉप हिल 5 ठार
31 जुलै 2014 चेंबूर एक ठार

मुंबईत गगनाला भिडणार्‍या घरांच्या किंमती, हक्काच्या मतदारसंघासाठी झोपडपट्‌ट्यांना राजकीय संरक्षण अशा वेगवेगळ्या कारणानं मुंबईतल्या टेकड्या झोपडपट्‌ट्यांनी वेढल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात, त्यात काही जणांचे जीव जातात. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे राहते. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार तरी केव्हा असाच प्रश्न मुंबईकरांना पडलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close