एक ‘माळीण गाव’ अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत !

August 1, 2014 11:06 PM0 commentsViews: 1093

मोहन जाधव, रायगड

01 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यात 2005 साली माळीणसारखीच दुर्घटना घडली. यातल्या काही गावांचं पुनर्वसन झालं. पण, 48 बळी गेलेल्या दासगावातले लोक अजूनही पत्र्याच्या घरात राहत आहेत. आश्वासनं देऊनही सरकार त्यांना घरं देऊ शकलेलं नाही.

माळीण गावच्या दुर्घटनेनं 2005साली रायगडमध्ये झालेल्या अशाच एका दुर्घटनेची आठवण ताजी झाली. 2005च्या जुलैमध्ये जुई, कोंडीवते, रोहन, दासगाव, कोंढवी आणि कोतवाल गावांमध्ये अशाच पद्धतीनं डोंगराकडा कोसळून 215 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला 9 वर्षं झाली. पण दासगावातल्या पीडितांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही.

2005 साली 25 व 26 जुलै रोजी जुई, कोंडिवते, रोहन आणि दासगाव अशा गावांमध्ये तर पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल गावामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. डोंगराचा भला मोठा भाग दगड मातीसह गावावर कोसळला होता आणि त्यात असंख्य ग्रामस्थ अक्षरश: गाडले गेले होते. जुई गावात 94, कोंडीवते मध्ये 33,रोहन मधील 15 आणि दासगाव गावातील 48 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता.

तर यासह जिल्ह्यातील पोलादपूर,माणगाव, रोहा, पनवेल, खालापूर येथे एकूण 25 अशी एकूण रायगड जिल्ह्यात 215 जणांचा मृत्यू झाला होता. जखमींची संख्या देखील तितकीच होती. दासगावमध्ये आजही या घटनेच्या आठवणी तेथील उरल्यासुरल्या भिंती आणि उभे राहिलेले खांब देत आहेत. जे नातेवाईक जिवंत राहिलेत त्यांच्या अजूनही मरणयातना सुरू आहेत.

घरं बांधण्यासाठी सरकारने देऊ केलेला निधी अडकून पडलाय. सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करूनही योग्य प्रतिसाद मिळत नाही, असं स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे.

सरकारने आता माळीणच्या पीडितांच्या पुनर्वसनाचं आश्वासन दिलंय. या निमित्ताने त्यांना दासगावकरांचीही आठवण होईल आणि 9 वर्षांनंतर का होईना त्यांना पक्की घरं मिळतील, अशी आशा आहे.

त्यानंतर आजपर्यंत सर्वठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना पुनर्वसन झाले असले तरी दासगावकरांची हाक अजूनही शासनाला ऐकू येत नाही. घरं बांधण्याचा निधी पुन्हा अडकल्याने दासगावकरांना घरे मिळत नाहीत. तर ते अजूनही 9 वर्षे पत्र्याच्या घरात राहत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close