दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, 5 ऑगस्टला सेनेत

August 2, 2014 3:09 PM0 commentsViews: 1289

Kesarkar new02 ऑगस्ट : सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आता ठरल्याप्रमाणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. केसरकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी केसरकर अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. 5 ऑगस्ट रोजी सावंतवाडीमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे या मेळाव्यात केसरकर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहे.

मागील महिन्यात 13 जुलै रोजी केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. पण आमदारकीचा राजीनामा वेळेवर देऊ आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सेनेत प्रवेश करु असं केसरकर यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सिंधुदुर्गात केसरकर यांनी पक्षाविरोधात बंड पुकारून काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला होता. खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजूत काढून सुद्धा केसरकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी राष्ट्रवादीने केसरकरांवर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती.

केसरकरांच्या विरोधामुळे निलेश राणे यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले. त्याचवेळी केसरकर सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. अखेर केसरकरांनी लोकसभा निवडणुकीचा कौल पाहून शिवसेनेची वाट धरलीय. आता येत्या 5 ऑगस्ट रोजी केसरकर सेनेत दाखल होती. त्यांच्या प्रवेशामुळे कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असा जुना संघर्ष आणखी जोमाने सुरू होईल अशी चर्चा आता सुरू आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close