स्पेशल कोर्टात कसाबवर 86 गुन्हे दाखल

May 6, 2009 11:45 AM0 commentsViews: 1

6 मे 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाबवर 86 गुन्हे दाखल झाले आहेत. या हल्ल्यात कसाबने एके- 47 ने 72 निष्पाप जीवांचा बळी घेऊन अमानुष कृत्य केल्याचा आरोपही सिद्ध करण्यात आला आहे. आज स्पेशल कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू असताना अतिरेकी कसाबवर हे आरोप ठेवण्यात आले असून ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच या सुनावणीदरम्यान कसाब आणि इतर दोन आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्यावरही एकूण 312 आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी 86 आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी कसाबला त्याचं वय विचारलं असता आपण 21 वर्षाचे आहोत हे कसाबनं मान्य केलं आहे. त्यामुळे कसाब अल्पवयीन नसल्याचं उघडकीस आलं आहे. तरीही आपल्यावर ठेवण्यात आलेले कुठलेही आरोप मान्य नसल्याचं या तिन्ही आरोपींनी कोर्टात सांगितलं आहे.विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे आरोप कोर्टासमोर मांडले आहेत. यात कसाबवर दहशतवादी कारवायांसह भारतातील हिंदु मुस्लिम ऐक्याला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह इतरही अनेक आरोप ठेवण्यात आलेत. कसाबचं आरोपपत्र ऍड. अब्बास काझमी यांनी स्विकारलं आहे. तर सरकारच्या बाजूनं 26 /11चा खटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवत आहेत. 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या या खटल्याच्या सुनावणीचा हा बाविसावा दिवस आहे. परिणामी या क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणा-या खटल्याच्या आरोपींवरचे आरोप निश्चित होत आहेत की नाही याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

close